Kalyan Marathi Girl Assault Case: कल्याण शहरातील नांदिवली भागात एका खाजगी रुग्णालयात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली होती. एका रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतील पुरूषाने बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना रुग्णालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आरोपी गोकुळ झा (Gokul Jha) हा मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर आपटताना आणि तिला फरफटत नेताना दिसला. या प्रकरणात आता वेगळाच ट्विस्ट आला आहे. पीडिता असलेली मराठी रिसेप्शनिस्ट तरुणी सोनाली (Sonali) हिने आधी एका महिलेला चपराक लगावली होती, असे एक फुटेज सध्या समोर आले आहे.
काल दिवसभरात कल्याण मारहाण प्रकरण गाजले. कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने किरकोळ वादानंतर मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला होता. मात्र या मारहाणीच्या घटनेआधी एक वेगळाच प्रकार घडला असल्याचे आता समोर आले आहे. सर्वात आधी गोकुळ झा आणि काही मंडळी तेथील मराठी रिसेप्शनिस्ट तरूणीशी वाद घालत होते. त्यानंतर गोकुळ झा याने रिसेप्शन काऊंटरवर लाथ मारली. त्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या मराठी तरूणीने आधी फाईल फेकली. त्यानंतर तिने रागाने पुढे येऊन तेथील एका महिलेला चपराक लगावली. त्यानंतर तो वाद चिघळला आणि पुढे गोकुळ झा याने त्या तरूणीला मारहाण केली.
दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर आरोपी गोकुळ झा हा फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. पण रात्री गोकुळ झा याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर गोकुळ झा यांच्या आईने यासंबंधीचा प्रकार सांगितला. रिसेप्शनिस्ट तरूणीने गोकुळच्या वहिनीच्या कानशिलात लगावली होती, त्यामुळे गोकुळला राग आल्याचे त्यांनी एबीशीमाझाशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता पोलिस या प्रकरणात नव्या अँगलने तपास करत आहेत.