शाहरुख खानसह जुही चावला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 20:07 IST
अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) रोझव्हॅली चीटफंड घोटाळ्याप्रकरणी तीन कंपन्यांची जवळपास ७० कोटींहून अधिक किंमतीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
शाहरुख खानसह जुही चावला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील २५ एकर जमीन आणि हॉटेल तर मुंबईतील फ्लॅट अशी ऐकून ७० कोटी ११ लाखांची मालमत्तांचा समावेश आहे. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. रोझव्हॅलीशी जे काही करार करायचे होते, के प्रायोजकतेच्या करारांशीच संबंधीत होते.
मुंबई - बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान तसेच अभिनेत्री जूही चावला आणि पती जय मेहता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) रोझव्हॅली चीटफंड घोटाळ्याप्रकरणी तीन कंपन्यांची जवळपास ७० कोटींहून अधिक किंमतीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
संपत्ती जप्त केलेल्या या कंपन्यांमध्ये मे. मल्टीपल रिसॉर्ट्स लिमिटेड, सेंट झेवियर्स महाविद्यालय, केकेआर स्पोर्ट्स लिमिटेड आणि पश्चिम बंगालमधील २५ एकर जमीन आणि हॉटेल तर मुंबईतील फ्लॅट अशी ऐकून ७० कोटी ११ लाखांची मालमत्तांचा समावेश आहे. ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक व्यक्ती आणि त्यांच्या कंपन्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ज्यांना रोझव्हॅली या समुहाकड़ून फंड मिळत होता. शिवाय तीन कंपन्यांची बँक खातीसुद्धा गोठवण्यात आली आहेत. त्यामध्ये १६.२० कोटींची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे. हस्तगत करण्यात आलेल्या या संपत्तीत पश्चिम बंगाल येथील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील रामनगर आणि महीशदल येथे असणारी २५ एकर जमीन आणि रोझव्हॅली समूहाचं एक हॉटेल, मुंबईतील दिलकाप चेंबर्समध्ये असणारा फ्लॅट देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. कोलकाता संघाशी संबंधित काही व्यक्तींनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. रोझव्हॅलीशी जे काही करार करायचे होते, के प्रायोजकतेच्या करारांशीच संबंधीत होते. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात कोणता ट्विस्ट येणार याकडे लक्ष लागले आहे.