झाशी - शरीराची भूक माणसाला आगीत जाळून टाकते असं बोलतात. झाशीमधील एका विवाहितेला यातूनच स्वत:चा जीव गमवावा लागला आहे तर दुसरीकडे माजी सरपंच संजय पटेल याला स्वत:वर नियंत्रण ठेवता न आल्याने आज तो जेलमध्ये आहे. लग्नासाठी सातत्याने दबाव टाकणाऱ्या महिलेला संजय पटेल आणि त्याच्या २ साथीदारांनी कायमचे संपवले. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि पोत्यात भरून काही नदीत तर काही विहिरीत फेकून दिले. रचना यादव असं या महिलेचे नाव असून तिचे याआधी २ लग्न झाली होती. दोन्ही नाती वादामुळे तुटली त्यानंतर ती संजय पटेलची प्रेयसी बनली.
मध्य प्रदेशातील रचना यादवचं टिकमगड येथे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून तिला २ मुले होती. ५ वर्षानंतर पतीसोबत झालेल्या वादानंतर ती माहेरी आली. तिथे तिने महेबा गावातील शिवराज यादव याच्याशी संबंध बनवले. त्याच्यासोबत ती राहू लागली. काही काळानंतर शिवराजसोबतही तिचा वाद झाला. २०२३ मध्ये रचनाने शिवराजच्या मोठ्या भावावर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या गुन्ह्यात पती शिवराजचेही नाव टाकले. या प्रकरणाच्या खटल्यावेळी ती कोर्टात जायची. त्यावेळी तिची ओळख तत्कालीन सरपंच संजय पटेलशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली.
दुसऱ्या पतीचं याच वर्षी निधन
यावर्षी जूनमध्ये शिवराजचा मृत्यू झाला तेव्हापासून रचना यादव स्वतंत्र राहते. त्यामुळे तिने संजय यादववर लग्नासाठी दबाव टाकला. संजय पटेल आधीच विवाहित होता, तो या लग्नासाठी तयार नव्हता. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि २ मुले होती. रचना आता संजय पटेलला धमकावत होती. याच धमकीला वैतागून संजय पटेलने तिचा काटा काढण्याचं षडयंत्र रचले. त्यासाठी त्याला त्याच्या भाच्याची आणि मित्राची मदत झाली.
भेटायला बोलावले अन् गळा दाबला
९ ऑगस्टला संजयने रचनाला भेटण्यासाठी बोलावले आणि तिचा गळा दाबला. त्यानंतर आरोपींनी मिळून तिच्या मृतदेहाचे ७ तुकडे केले. पुरावे मिटवण्यासाठी डोके आणि पाय लखेरी नदीत फेकले. १३ ऑगस्टला मृतदेहाचे तुकडे मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर प्रियकर संजय पटेल आणि त्याचा भाचा संदीपला अटक करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. या हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी १० पथके नेमली होती.
रचनाच्या कॉल डिटेल्सने झाला खुलासा
टीकमगडला राहणाऱ्या रचनाच्या भावाने बहिणीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिचा पत्ता लागला नाही. तिचा फोन स्विच ऑफ येत होता. त्यानंतर तो पोलिसांकडे गेला तेव्हा पोलिसांनी रचनाचा फोन सर्व्हिलांसला लावला. तेव्हा संजय पटेलसोबत तिचे बोलणे झाले होते. तपास केला असता संजय पटेलही बेपत्ता होता. त्यानंतर सापळा रचत पोलिसांनी संजय पटेलला पकडले. त्याला खाकीचा धाक दाखवताच त्याने हत्येचा गुन्हा कबूल केला. या प्रकरणाचा ७ दिवसांत छडा लावणाऱ्या पोलीस पथकाला ५० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.