सिंचन घोटाळ्यात १० अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 08:58 PM2020-02-12T20:58:59+5:302020-02-12T21:07:36+5:30

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध सात कामांच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमितताप्रकरणी १० अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी नव्याने सात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Irrigation scam: crime registered against 10 officers | सिंचन घोटाळ्यात १० अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

सिंचन घोटाळ्यात १० अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देगोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील सात कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितताएसीबीच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध सात कामांच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमितताप्रकरणी १० अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी नव्याने सात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या तक्रारीवर सदर पोलीस स्टेशन येथे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या १० अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यात मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता श्रीपाद मधुकर आपटे, कार्यकारी अभियंता प्रभाकर विठ्ठलराव मोरघडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता (सेवानिवृत्त) वसंत ग्यानदेव गोन्नाडे, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय लक्ष्मण खोलापूरकर, अधीक्षक अभियंता दिलीप देवराव पोहेकर, तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराव शिर्के, तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास मारुती लांडगे, विभागीय लेखाधिकारी सी. टी. जिभकाटे व तत्कालीन विभागीय लेखाधिकारी गुरुदास सहादेवराव मांडवकर यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१), (ड) सह १३ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या गृह विभागाच्या आदेशानुसार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरअंतर्गत सिंचन प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहारासंबंधी खुली चौकशी करण्याचे आदेश अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोला देण्यात आले होते. त्यानुसार एसीबी महासंचालकांनी गोसेखुर्द प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रिया आणि त्यादरम्यान झालेल्या एकूणच गैरव्यवहाराची चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक एसीबी नागपूर यांना दिले होते. या आधारावर एसीबी अधीक्षकांची खुल्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक नेमले. या खुल्या चौकशीत सात कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याची व यात जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले. यानंतर बुधवारी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. या आधारावर सदर पोलिसांनी नव्याने सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. एसीबी नागपूरचे विशेष पथक पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Irrigation scam: crime registered against 10 officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.