नालासोपारा : वसई पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोठा मामा आणि सख्ख्या भावानेच पीडित मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने बुधवारी वसई पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आपला भाऊ आणि मामासोबत राहते. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये तिच्या १८ वर्षीय भावाने जबरदस्ती करून व धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवले.
जवळच्या व्यक्तींकडून विश्वासघातपीडित मुलीचे हातपाय व तोंड ओढणीने व रुमालाने बांधून मामाला काहीही सांगू नको, नाहीतर तुला मारीन, अशी धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर मुलीच्या मोठ्या मामाने ती घरामध्ये झोपलेली असताना तिच्या तोंडावर हात ठेवून ओरडू नको, नाहीतर मारीन, अशी धमकी देत शारीरिक संबंध केले. ती गर्भवती राहिल्याचे मामाला समजल्यानंतर तिला मुंबईत नेऊन तिचा गर्भपात केला. वसई पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना, हे अत्याचार ओळखीतील लोकांकडूनच केले जात असल्याचे समोर आले आहे.