कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका व्यक्तीने बस स्टँडवरच त्याच्या पत्नीला संपवले आहे. आरोपी लोहिताश्वने पत्नीवर सगळ्यांसमोर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. यावेळी तिची १२ वर्षाची मुलगीही तिथेच होती.
माहितीनुसार, लोहिताश्व आणि रेखा यांचं ३ महिन्यापूर्वी लग्न झाले होते. ते दोघे खूप काळापासून एकत्र होते. मृत रेखाचे हे दुसरे लग्न आहे. तिला पहिल्या पतीपासून २ मुली आहेत. रेखाची एक मुलगी तिच्या आई वडिलांकडे म्हणजे आजी आजोबांकडे राहते. दुसरी १२ वर्षीय मुलगी रेखासोबत असते. रेखाने तिच्या पतीपासून विभक्त होऊन दुसरं लग्न केले होते. दुसरीकडे आरोपी लोहिताश्व हादेखील घटस्फोटीत होता. दोघेही लग्न करून एका भाड्याच्या खोलीत राहत होते. याचवेळी रेखाला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी लागली. लोहिताश्व बेरोजगार होता, त्यालाही नोकरी लावण्यासाठी रेखाने मदत केली. त्याला वाहन चालकाची नोकरी मिळाली होती. परंतु लोहिताश्वला घरातून बाहेर पडायला आवडत नव्हते. त्यात रेखाचे अन्य कुणाशी संबंध असल्याचा संशय त्याला आला. यावरून रेखा आणि लोहिताश्व यांचे वाद होऊ लागले.
रेखाचे परपुरुषाशी संबंध आहेत असा आरोप लोहिताश्वचा होता. त्यातूनच सोमवारी सकाळी बसची वाट पाहत स्टँडवर उभ्या असणाऱ्या रेखावर त्याने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीने रेखावर सपासप वार केले. त्यात रक्तबंबाळ झालेल्या रेखाचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यावेळी रेखाची मोठी मुलगी तिथेच उपस्थित होती. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने रेखाला हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे नेण्याआधीच रेखाचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पती तिथून पसार झाला. मात्र पोलिसांनी पुरावे शोधत आरोपीला अटक केली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.