कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात सैयारा सिनेमा पाहिल्यानंतर युवकाने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. काकादेव परिसरात युवकाने गळफास घेत स्वत:ला संपवले. लखन शुक्ला असं २४ वर्षीय मृत युवकाचे नाव आहे. मागील २ महिन्यापासून तो घटस्फोटित महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. मात्र याच महिलेने युवकाची हत्या केली असा आरोप कुटुंबाने लावला असून या प्रकरणी रावतपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
माहितीनुसार, जेव्हा शेजाऱ्यांनी लखनच्या खोलीतून किंचाळण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा त्यांनी दरवाजा ठोठावला परंतु आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर या लोकांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आतून युवकासोबत राहणाऱ्या महिलेने चावीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच आतील दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला. लखनचा मृतदेह अर्ध शरीर बेडवर अर्ध जमिनीवर पडल्याचे दिसून आले. त्याशिवाय पंख्याला एक तुटलेला फासही दिसत होता.
मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ आला समोर
घटनास्थळी युवकाच्या मृत्यूपूर्वीचा ४ मिनिटे २४ सेकंदाचा व्हिडिओ समोर आला आहे ज्याने अनेक प्रश्नचिन्ह उभे केलेत. त्यात महिला गुनगुन रडत रडत म्हणते की, भैया, आम्ही तर राहतोय, फक्त याला नोकरी करावी लागत होती. जेव्हा शेजाऱ्यांनी विचारले, एकाच खोलीत असताना लखनने आत्महत्या कशी केली तेव्हा त्यावर महिला स्पष्ट उत्तर देऊ शकली नाही. लखनने आतून टाळे लावून आत्महत्या केली असं महिलेने सांगितले परंतु शेजाऱ्यांनी आम्ही कित्येक वेळ दरवाजाबाहेर उभे होतो परंतु महिलेचा मदतीसाठी काहीच आवाज आला नाही असं म्हटलं.
सैयारा पाहिल्यानंतर वाढला वाद
हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी आणि मृत युवकाच्या कुटुंबाने म्हटले की, हे दोघे सैयारा सिनेमा पाहायला गेले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये वाद सुरू आहे. गुनगुन हा सिनेमा तिच्या प्रेम कहानीशी जोडून पाहत होती. ज्यामुळे लखन अस्वस्थ झाला. त्यातूनच या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि दुसऱ्याच दिवशी आत्महत्येसारखी घटना घडली. तर गुनगुनने माझ्या मुलाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्याच्याकडून लाखो रुपये वसूल केले. लखन आधी स्वीट हाऊसमध्ये काम करायचा. मागील काही महिन्यांपासून तो काम करत नव्हता. तो घरातून आईचे दागिने आणि बचतीचे पैसे घेऊन निघून गेला. जेव्हा लखनकडील पैसे संपले तेव्हा गुनगुनने त्याची हत्या केली असा आरोप मृत युवकाच्या वडिलांनी केला.
दरम्यान, सध्या हे प्रकरण संशयास्पद आहे. पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत. तपासात गुनगुनचे २०२४ साली दिल्लीतील युवकासोबत लग्न झाले होते मात्र काही काळातच ती माहेरी परतल्याचे समोर आले. त्यानंतर गुनगुन सासरी गेलीच नाही. मग ती लखनच्या संपर्कात आली. हे दोघेही सोबत राहू लागले. गुनगुन आजही तिच्या आधीच्या पतीशी बोलायची त्यातून लखनच्या मनात असुरक्षेची भावना होती असं त्याचे मित्र सांगतात. युवकाच्या पोस्टमोर्टम रिपोर्टनंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा सर्व अँगलने पोलीस तपास करत आहेत.