बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यात पती-पत्नीनं टोकाचे पाऊल उचललं आहे. याठिकाणी एका बंद खोलीत पती-पत्नीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. पत्नीचा मृतदेह बेडवर पडला होता तर पतीचा मृतदेह गळाफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मृतांमध्ये २१ वर्षीय शुभम कुमार आणि त्याची पत्नी मुन्नी देवीचा समावेश आहे. या दोघांनी मृत्यूच्या काही तास आधी शुभमच्या फेसबुक अकाऊंटवर सर्वांचा निरोप घेतला होता. दोघांचा आंतरजातीय विवाह झाला होता ज्यातून पत्नीच्या माहेरचे नाराज होते.
मृत शुभम कुमार बहदरपूरचा रहिवासी होता तर मुन्नी देवी बागडोब गावात राहणारी होती. ती रामबालक शर्मा यांची मुलगी होती. घरात मुलगा आणि सूनेचा मृतदेह पाहून कुटुंबाने आक्रोश केला. एकमेकांशी झालेल्या वादातून पती-पत्नीने आत्महत्या केली अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोघांचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. पोस्टमार्टमनंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. पती-पत्नीचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात लोकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती.
मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच शुभमच्या आईची अवस्था अगदी बिकट झाली होती. त्यांनी सांगितले की, मी जेवणासाठी मुलाला आवाज दिला होता. मात्र खोलीतून काहीच उत्तर आले नाही. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने मला संशय आला. कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मी त्याच्या खोलीजवळ गेले तेव्हा आतून दरवाजा बंद होता. घरच्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी समोरील दृश्य पाहून आम्हाला धक्का बसला. खोलीत सूनेचा मृतदेह बेडवर पडलेला होता तर मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता असं त्यांनी म्हटलं.
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज
९ महिन्यापूर्वी शुभम आणि मुन्नी देवीचं आंतरजातीय विवाह झाला होता. सूनेचे आई वडील या लग्नामुळे आनंदी नव्हते. लग्नाच्या ३ महिन्यानंतर त्यांनी मुलीला जबरदस्ती घेऊन गेले. त्यांनी मुलीचं सिंदूरही धुवून टाकले होते. मात्र मुलीने हट्ट सोडला नाही म्हणून अलीकडेच त्यांनी मुलीला आमच्या गावाच्या काही अंतरावर सोडून निघून गेले. ती पुन्हा घरी आली. मुलगा-सून आनंदाने जीवन जगत होते. परंतु मंगळवारी वाईट दिवस आला असं शुभमच्या आईने सांगितले तर आम्हाला नेमकं काय झाले माहिती नाही. त्या दोघांनी आत्महत्या का केली कळत नाही असं मुन्नी देवीच्या वडिलांनी सांगितले. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे.