बरेली - उत्तर प्रदेशातील बरेली इथं एका वकिलाची पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळाली आहे. पत्नी सोडून गेल्याचा विरह सहन न झाल्याने पतीनेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्याची त्याची प्रकृती गंभीर असून जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली. ज्यात माझ्या मुलांना पत्नीकडे सोपवू नका असं म्हटलं आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.
बरेली येथे एका वकिलाचे जवळपास ८ वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना २ मुले आहेत. मागील काही महिन्यांपासून त्याच्या पत्नीचे एका युवकाशी प्रेमसंबंध सुरू होते. नातेवाईकांनी बऱ्याचदा तिला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तिने ऐकले नाही. काही दिवसांपूर्वी ती घरातून अचानक गायब झाली. ती माहेरी गेली असावी असं घरच्यांना वाटले. परंतु जेव्हा ती तिथेही सापडली नाही तेव्हा पतीने पत्नीचा शोध सुरू केला. त्यावेळी ती प्रियकरासोबत पळाल्याचं पुढे आले. या माहितीने पतीला मोठा धक्का बसला.
सुसाइड नोटमध्ये काय लिहिले?
पत्नी सोडून गेल्याने वकील पतीला नैराश्य आले. त्याने राहत्या घरीच विष प्यायले. जेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता तेव्हा नातेवाईकांनी त्याला पाहिले आणि तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारावेळी डॉक्टरच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली. त्यात लिहिले होते की, मी आता जगू शकत नाही. जिने मला आणि माझ्या मुलांचा विश्वासघात केला, तिला माझ्या मुलांकडे आणू नका. ही सुसाइड नोट वाचून नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू आले. सध्या पोलिसांनी ही नोट जप्त करत पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, हे प्रकरण कौटुंबिक वादातले असून पोलीस वकिलाची पत्नी आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत. जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो जबाब देण्याच्या स्थितीत नाही. शुद्धीवर आल्यानंतर त्याचा जबाब नोंदवू असं पोलिसांनी म्हटलं. दुसरीकडे या प्रकारामुळे मुलांची चिंता कुटुंबाला सतावू लागली आहे. त्यांनी सून आणि तिच्या प्रियकराला लवकर पकडा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.