उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एका इंजिनिअरचा हॉटेलच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा युवक मेरठचा असून त्याचे नाव रोहित असल्याचे समोर आले. त्याने पेनड्राईव्हमध्ये सुसाइड नोटही मागे सोडली आहे. त्यात त्याने त्यांच्या इच्छांबाबत यादी बनवली आहे.
रविवारी रात्री मेरठमध्ये एका इंजिनिअरने गळफास घेत आत्महत्या केली. हॉटेलमधील खोलीचा दरवाजा उघडला नाही तेव्हा कर्मचाऱ्यांना संशय आला. दार ठोठावले परंतु आतून काहीच प्रतिसाद आला नाही. मग पोलिसांना सूचना देण्यात आली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा इंजिनिअरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. हे दृश्य पाहून हॉटेल कर्मचारी भयभीत झाले. पोलिसांनी संबंधित मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. घटनास्थळी पोलिसांना एक पेनड्राईव्ह सापडला आहे, तो त्यांनी जप्त केला.
पेनड्राईव्ह तपासला तेव्हा त्यात अजब गजब गोष्टी सापडल्या. त्यात पीडीएफ फाईलमध्ये सुसाइड नोटही होती. ३१ वर्षीय रोहित मेरठच्या शिवरामपूर येथे राहणारा होता. पोलिसांना त्याच्या घरच्यांची माहिती मिळताच चौकशी केली. तेव्हा युवक गाजियाबाद येथे इंजिनिअर करत असल्याचे समोर आले. युवक अविवाहित होता, २ वर्षापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते. वडील आणि मुलगा हे दोघेच घरी राहत होते. त्यांचा मोठा मुलगा मुंबईत आयआयटीत शिक्षण घेत आहे. मोठा मुलगा आणि २ मुलींचे लग्न झाले. रोहित १० जुलैपासून घराबाहेर होता. तो कुठे जातोय हे त्याने घरच्यांना सांगितले नाही. वडील पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी आहेत.
१३ दिवसांचा ड्रामा नको
या घटनेबाबत एसीपी लोहामंडी यांनी म्हटलं की, रोहित याच्या सुसाईड नोटमधूनही आत्महत्येचे कारण स्पष्ट होत नाही. त्याने कुणालाही जबाबदार धरले नाही. रोहित रविवारी संध्याकाळी हॉटेलमध्ये राहायला आला होता. सुसाइड नोटमध्ये मोहितचा नंबर आणि आणखी २ नंबर लिहिले होते. दोन्हीही नंबर परदेशातील आहेत. मी जसा गायब आहे, तसाच राहू द्या. मला कुठलाही ड्रामा नको. १३ दिवस ड्रामा करण्याची गरज नाही. नातेवाईकांना काही सांगण्याची आवश्यकता नाही असं नोटमध्ये लिहिले आहे.
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर
दरम्यान, सुसाइड नोटमध्ये आणखी एक कॉलम लिहिला आहे, जर लास्ट टाइम यू टर्न मारायला असता तर डॉक्टर वाचवू शकली असती. मी तिचा पहिला रूग्ण तर ती माझी शेवटची डॉक्टर आहे. माझे शरीर एसएन मेडिकल कॉलेजला दान करा. शक्य असेल तर अवयदान दान करा. मी गायब होऊ शकतो पण माझी बॉडी नाही. सुसाइड नोट इंग्रजी आणि रोमन भाषेत लिहिली आहे. पेनड्राईव्हमध्ये मोहित नावाची पीडीएफ फाईल आहे. मात्र रोहितने सुसाइड का केले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्याने पहिल्या ओळीत एसएन मेडिकल कॉलेज, महिला डॉक्टरचं नाव आणि नंबर लिहिला आहे. त्यापुढे कुणाचीही चौकशी करण्याची गरज नाही, हा माझा निर्णय आहे असं रोहितने मृत्यूपूर्वी लिहिले आहे.