उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील मगरासा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दारूच्या नशेत सोमपाल नावाच्या युवकाने त्याच्या २५ वर्षीय गर्भवती पत्नी सूमनला दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. सूमन ५ महिन्याची गर्भवती होती. जेव्हा सूमनचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा त्यात तिची क्रूरपणे हत्या झाल्याचं निष्पन्न झाले.
सूमनचे वडील पूरनलाल यांनी सांगितले की, माझ्या मुलीचं ५ वर्षापूर्वी लग्न झाले होतं. सुरुवातीला सर्व काही ठीक सुरू होते. परंतु काही महिन्यांनी तिचा पती सोमपाल सूमनवर अत्याचार करू लागला. तो सतत दारू पिऊन तिला मारहाण करायचा. हुंड्यासाठी १ लाख रूपये आण अशी मागणी करायचा असं त्यांनी म्हटलं. घटनेच्या दिवशी जेव्हा सोमपाल दारू पिऊन घरी आला तेव्हा त्याने सूमनशी वाद घातला. त्यानंतर तो तिला मारू लागला. सूमन जीव वाचवून दुसऱ्या खोलीत पळाली, जिथे तिची दिव्यांग सासू होती. आई मला वाचवा, तो मला मारून टाकेल असं ती म्हणत होती. तेवढ्यात सोमपाल तिथे पोहचला, त्याने आईला धक्का दिला आणि तिला बाथरूममध्ये बंद केले.
त्यानंतर सोमपालने सूमनला घरात नेले आणि तिथे दांडक्याने मारहाण केली. गावकरी, शेजारी जमले मात्र कुणीही सूमनला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना कळली तेव्हा ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोवर उशीर झाला होता. पोलीस पोहचले तेव्हा सूमनचा मृतदेह पडला होता. तिचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यात सूमनचे दोन्ही हात आणि एक पाय तुटला होता. लिव्हरही फाटले होते. गर्भात वाढणारी ५ महिन्याची मुलगी तिचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सोमपालविरोधात कौटुंबिक हिंसाचार, हत्या आणि इतर कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आरोपी पती सोमपाल सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ३ पथके नेमली आहेत. पोलीस गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करत असून लवकरात लवकर आरोपीला अटक करू असं एसपी अंशिका वर्मा यांनी म्हटले आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. लोकांमध्ये संताप आहे कारण कुणीही सूमनला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. मुलीच्या हत्येनंतर सूमनच्या आई वडिलांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. जर आमच्या मुलीला न्याय मिळाला नाही तर आम्ही हायकोर्टात जाऊ असं तिच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.