मध्य प्रदेशातीलउज्जैन जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीने डोक्यावर पदर न घेतल्याच्या रागातून पतीने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला भरधाव दुचाकीवरून रस्त्यावर फेकून दिले, ज्यामुळे उपचारादरम्यान त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
उज्जैनमधील बडनगर पोलीस स्टेशन परिसरातील उमरिया गावात राहणारा आझाद शाह आपली पत्नी मुस्कान आणि तीन वर्षांचा मुलगा तनवीर यांच्यासोबत बडनगरच्या बाजारात गेला होता. बाजारामधून खरेदी करून ते तिघे दुचाकीवरून गावाकडे परतत होते.
डोक्यावर पदर घेण्यावरून सुरू झाला वादवाटेत चौपाटीजवळ पोहोचल्यावर आझादने दुचाकी थांबवली. वाटेत गावाचे लोक दिसल्याने त्याने पत्नी मुस्कानला डोक्यावर पदर घेण्यास सांगितले. आझादने तिला धमकी दिली की, जर तिने डोक्यावर पदर घेतला नाही, तर तो मुलाला रस्त्यावर फेकून देईल. मुस्कानने पतीचे बोलणे ऐकले खरे, पण तिने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही आणि गावाजवळ येऊनही डोक्यावरून पदर घेतला नाही. ती आझादच्या बोलण्यावर टाळाटाळ करत राहिली.
रागाच्या भरात पित्याने मुलाला फेकले!पत्नीच्या या वागण्यामुळे आझादला प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्याने दुचाकीवर पुढे बसलेल्या तीन वर्षांच्या तनवीरला उचलून थेट रस्त्यावर आपटले. यामध्ये तो चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि हात-पायांना जबर मार लागला.
चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपी पित्याला अटकगंभीर जखमी झालेल्या तनवीरला तात्काळ बडनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मुस्कानने आपला पती आझाद शाहविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. बडनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी आझादला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर केले, जिथून त्याला थेट कारागृहात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आता हत्या (murder) प्रकरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.