तब्बल ५० हजारांचे इनाम असलेल्या एक कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्याकडून आणखी एका मोठ्या गुन्ह्याची उकल झाली, जी ऐकून सगळेच हादरून गेले. बिहारच्या बोधी बिघा भागात झालेल्या एका दरोड्या प्रकरणामागचे एक मोठे षडयंत्र समोर आले आहे. या भागात आरोपीने एका जोडप्याला लुटून, त्यातील पत्नीला गोळी मारून ठार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पतीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान घटनेच्यावेळी त्या भागात अनेक मोबाईल फोन सक्रिय असल्याचे पोलिसांना दिसले.
तपासानंतर पोलिसांनी याच भागात राहणाऱ्या आकाश कुमार याला छत्रपती संभाजी नगरमधून ताब्यात घेतले. आकाशकडून पोलिसांना एक मोबाईल फोन आणि घटनेसाठी वापरण्यात आलेली बंदूक मिळाली. यानंतर पोलिसांनी सूरज कुमार नामक त्याच्या साथीदाराला देखील ताब्यात घेतले. दोघांची उलट तपासणी सुरू करताच एक वेगळेच सत्य सगळ्यांसमोर आले. दोघांनी मिळून त्या जोडप्याला लुटले नव्हते, तर पतीनेच पत्नीला मारण्याची सुपारी दिली असल्याचे त्यांनी म्हटले. आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी पती पंकज कुमार याला देखील अटक केली आहे.
कुख्यात गुंडाची घेतली मदत!
पतीने पत्नीची हत्या घडवून आणण्यासाठी मित्र अमर राज उर्फ बाबा याची मदत घेतली. हा राज बोधी बिघा गावातील रहिवासी आहे. त्यांनी हत्येसाठी तीन लाख रुपयांचा सौदा केला. त्याने त्याचा गुन्हेगारी साथीदार आकाश कुमार याची ओळख पंकज कुमारशी करून दिली. त्यानंतर, नियोजन करून आकाश कुमार, सूरज कुमार, रामराज कुमार आणि धर्मवीर कुमार यांनी ही घटना घडवून आणली.
मुख्य गोळीबार करणाऱ्याला स्टेशनवर अटक
आरोपी पंकज कुमारने दिलेल्या माहितीच्या आधारे, डुमरिया पोलिस स्टेशन परिसरातील सलैया गावातील रहिवासी रामराज कुमार याला अटक करण्यात आली. या पूर्वनियोजित खून प्रकरणात यापूर्वी इतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोटारसायकल वापरणाऱ्या आणि चालकाची भूमिका बजावणाऱ्या धर्मवीर कुमारला या गुन्ह्यासाठी ५०,००० रुपये मिळणार होते. या प्रकरणातील मुख्य शूटर अमर राज उर्फ बाबा होता, ज्याच्या अटकेसाठी सरकारने यापूर्वी ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याला गया रेल्वे स्थानकाजवळ अटक करण्यात आली.
आधी त्याने त्याच्या पत्नीचा विमा काढला अन्...
आरोपी पंकज कुमारचे लग्न सामाजिक दबावामुळे जबरदस्तीने करण्यात आले होते. पंकजला त्याची पत्नी आवडत नव्हती. दरम्यान, तो त्याच्या मेव्हणीच्या प्रेमात पडला. दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते. आरोपी पतीने सांगितले की, गावकरी देखील त्याच्या पत्नीला अशुभ मानत होते. या मानसिक ताणामुळे आणि सामाजिक दबावामुळे त्याने दोन ते तीन महिन्यांपूर्वी तिची हत्या करण्याचा कट रचला होता. यासाठी त्याने आधी पत्नीचा मोठ्या रकमेचा विमा काढला आणि नंतर लूटमार झाल्याचे दाखवत तिला संपवले.