कुशीनगर - उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथे खाकी वर्दीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घडलेली घटना एखाद्या फिल्मी कहाणीसारखीच आहे. प्रेम, संशय, फसवणूक आणि नात्यातील विश्वासाचा शेवट सर्वकाही यात दिसून आले. एका महिला कॉन्स्टेबलने तिच्या प्रियकराला खोलीत बोलावले होते तेव्हा अचानक पती तिथे पोहचला. आधीच संशयाने मनात घर केलेल्या पतीने दरवाजा ठोठावला परंतु दरवाजा बंदच होता. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. अनेकदा दार ठोठावल्यानंतर पत्नी घराबाहेर पडली आणि तिने दरवाजा टाळा लावून प्रियकराला आतच लपवले. त्यानंतर पती आणि इतरांनी मिळून दरवाजा तोडला आणि प्रियकराला बाहेर काढले.
माहितीनुसार, कुशीनगरच्या कसया नगर परिसरात राहणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे विवाहबाह्य संबंध सुरू होते. त्याबाबत पतीला आधीच संशय होता, त्याने पत्नीच्या कुटुंबाला सांगितले होते. परंतु पुरावा नसल्याने सर्व गप्प होते. दीड वर्षापासून पती-पत्नी यांच्या नात्यात संशयाने घर केले होते. एकेदिवशी पती अचानक पत्नीच्या खोलीवर पोहचला तेव्हा तिचा दरवाजा बंद होता. अनेकदा दरवाजा ठोठावला तरीही पत्नीने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे संशय आणखी बळावला. अखेर त्याने पोलिसांना बोलावले. पोलीस पोहचले, दरवाजा तोडला तेव्हा आतील दृश्य पाहून प्रत्येकजण हैराण झाला. खोलीत महिलेचा प्रियकर बसला होता. त्यामुळे पतीचा राग अनावर झाला आणि त्याने प्रियकराला बेदम मारले. त्यानंतर प्रियकराला पोलिसांच्या हाती दिले.
पती, पत्नी अन् वो...तिघेही पोलीस कॉन्स्टेबल
प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या घटनेतील तिघेही उत्तर प्रदेश पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे. पती पोलीस लाईनमध्ये तैनात असतो, पत्नी कसया पोलीस ठाण्यात तर प्रियकर कॉन्स्टेबल सेवरही ठाण्यात ड्युटीवर आहे. महिला पोलीस कसया नगर येथे खासगी खोलीत भाड्याने राहत होती. पती-पत्नी या दोघांच्या नात्यात आधीपासून तणाव सुरू होता. त्याचवेळी महिला कॉन्स्टेबलचे दुसऱ्या कॉन्स्टेबलसोबत सूत जुळले. परंतु पतीची पत्नीवर नजर होती. दीड वर्षापासून पतीच्या मनात संशय दाटला होता. अखेर त्याचा संशय खरा ठरला.
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर कसया पोलीस ठाण्यातील वातावरणही तापले. महिलेच्या पतीने पोलीस ठाणे गाठत पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. परंतु ज्या परिसरात ही घटना घडली तिथे लोकांमध्ये हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. एखाद्या सिनेमासारखे दृश्य इथल्या लोकांना पाहायला मिळाले. आधी दरवाजा ठोठावला, त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला आणि पत्नी-प्रियकराला रंगेहाथ पकडले. मात्र सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलीसच वादात अडकल्याने लोकांच्या मनात पोलीस दलाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.