गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीच्या वादातून पतीचा कशा प्रकारे निर्घृणपणे काटा काढला जातोय याच्या बातम्या धडकत आहेत. पिंपात सिमेंटमध्ये पतीला घालून मारले जाते, या घटनेने तर कहरच केला आहे. आता अनेक ठिकाणाहून या हत्येसारखी धमकी मिळत असल्याच्या पत्नींविरोधात तक्रारी घेऊन पती पोलिसांत येत आहेत. अशातच आता पतीने जेवण मागितले म्हणून त्याला रागात घराच्या सज्ज्यावरून खाली ढकलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अनेकदा वादात लोक आपल्यावरील नियंत्रण गमावतात आणि त्यातून गंभीर घटना देखील घडतात. हा राग शांत झाला की आपण करून बसलो असे देखील वाटू लागते. परंतू, तोवर वेळ निघून गेलेली असते. यामुळे या क्षणिक रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. सध्या सोशल मीडिया, बदललेली जीवनशैली, आहार या गोष्टींमुळे लोकांना हीच गोष्ट जमेनाशी झाली आहे.
देशाची गुन्ह्यांची राजधानी बनलेल्या उत्तर प्रदेशमध्येच ही घटना घडली आहे. सुल्तानपूरमध्ये एका महिलेवर आरोप ठेवण्यात आले आहेत. तिला अटकही करण्यात आली आहे. पतीने जेवण मागितले होते, त्यावरून पती-पत्नीत वाद झाला आणि तिने त्याला गॅलरीतून खाली ढकलले. ४० वर्षांचा दिलशाद हा खाली पडल्याने जखमी झाला होता. त्याला घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये नेले परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आपल्या भावाला खाली ढकलताना नेमके त्याच्या बहिणीने पाहिले होते. यामुळे पत्नीचे बिंग पोलिसांसमोर उघड झाले. तरीही ती आपल्या बचावासाठी माझ्या लग्नाला ८ वर्षे झालीत, आतापर्यंत असे काही केले नाही मग आता का करेन असे म्हणत आहे. तसेच पती दारु पिऊन आला होता, त्याचा तोल जाऊन तो पडल्याचे ती सांगत आहे. पोलिसांनी पत्नीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच तिला अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.