नालासोपारा : नायगाव येथील आशानगर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय पत्नीची ३० वर्षीय पतीने केबलच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. हत्या केल्यानंतर आरोपी पती पळून गेला होता; पण वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी १२ तासांच्या आत आरोपीला सुरत येथून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगावच्या आशानगरमधील गावदेवी खुताडीपाडा येथील नीलमदेवी महतो (२७) हिची हत्या पती रमेश महतो (३०) याने केली आहे. हे जोडपे भाड्याने या ठिकाणी राहत होते. लग्न झाल्यापासून दिल्ली व सुरत येथे ते राहण्यास होते. काही महिन्यांपूर्वी ते नायगाव येथे राहण्यासाठी आले होते. ती दुसऱ्यांसोबत बोलत असल्याच्या संशयावरून पतीने चार्जर, केबल, मिक्सर केबलच्या साहायाने गळा आवळून तिची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर पती पळून गेला होता. पोलिसांनी सुरत येथील मित्राच्या घरातून त्याला अटक केली आहे.
पत्नीची हत्या करून पळालेल्या पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 10:42 IST