उत्तर प्रदेशच्या सोनभद्र इथं नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी २ वर्षापासून बेपत्ता झालेल्या पतीने अचानक एकेदिवशी पत्नीला कॉल केला. पतीचा आवाज ऐकून पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला. पतीने पत्नीला भेटण्यासाठी बोलावलं परंतु जेव्हा पत्नी पतीला भेटायला गेली तेव्हा तिथे जे पाहिले त्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली.
पतीच्या फोननंतर पत्नी त्याला भेटायला गेली तेव्हा पतीसोबत आणखी एक महिला होती. ही महिला कोण हा सवाल पत्नीने केला तेव्हा ती माझी गर्लफ्रेंड आहे असं सांगितले त्यानंतर पतीने गर्लफ्रेंडसोबत मिळून पत्नीला बेदम मारलं. या दोघांनी मिळून लोखंडी रॉडने महिलेला इतकं मारले की तिचा चेहरा रक्तबंबाळ झाला. ७ जणांनी मिळून महिलेला मारहाण केली. शेजाऱ्यांनी महिलेचा आवाज ऐकला तेव्हा त्यांनी आरोपीच्या तावडीतून महिलेची सुटका केली. या महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन पती, त्याची गर्लफ्रेंडसह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माहितीनुसार, पतीने ऑर्केस्टा डान्सरच्या मोहात अडकून पत्नीला आधी भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पती, त्याची प्रेयसी डान्सर आणि इतर जणांनी मिळून महिलेला मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. पती, प्रेयसी आणि त्याच्या घरातील ७ जणांनी चाकू, लोखंडी रॉडने महिलेला मारले. मारहाणीमुळे मोठा राडा झाला त्यात स्थानिक शेजाऱ्यांनी मिळून या महिलेला वाचवलं.
चेहऱ्यावर चाकूने वार
या घटनेतील पीडित महिलेने सांगितले की, माझा पती ऑर्केस्टा चालवायचा. त्याबाबत मला माहिती नव्हतं. त्याचे एका महिला डान्सरसोबत अफेअर होते तेदेखील त्याने लपवले होते. २ वर्षापूर्वी अचानक पती घर सोडून निघून गेला त्यानंतर रविवारी अचानक त्याने मला फोन केला. त्याने मला एकाच्या घरी भेटायला बोलावले. त्याठिकाणी मी पोहचले तेव्हा खोलीत ७ जण होते. तेव्हा पतीसोबत एक महिला होती ती त्याची गर्लफ्रेंड असल्याचे तो म्हणाला. त्यानंतर या सर्वांनी मिळून मला मारहाण केली. लोखंडी रॉडने हल्ला केला आणि माझ्या चेहऱ्यावर चाकूने वार केला.
दरम्यान, पतीने माझ्या नावावर ६ लाखाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडावे एवढीच माझी मागणी आहे. मला त्याच्याशी कुठलेही नाते ठेवायचे नाही. त्याला जिच्यासोबत राहायचे आहे तिने राहावे परंतु त्याने मला जी मारहाण केली त्यासाठीही त्याला शिक्षा मिळायला हवी अशी मागणी महिलेने केली आहे.