सोलापूर - डॉ. वळसंगकरांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर 'डॉक्टरांच्या शवविच्छेदनाच्या वेळी सुसाइड नोट सापडली, घटना घडल्यानंतर लगेचच पंचनामा झाला असता त्यावेळी आत्महत्येच्या प्रकरणात सर्वप्रथम सुसाइड नोट आहे किंवा नाही याची तपासणी होते, त्याची तपासणी केली नाही काय हा प्रश्न अनुत्तरीत असल्याचे सोलापूरकरांमधून उपस्थित केला जात आहे.
डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे माध्यमांसमोर सांगितले होते. मात्र त्यानंतर अचानक शवविच्छेदन करताना सुसाइड नोट सापडली. त्या सुसाइड नोटनुसार मनीषाला अटक करण्यात आली. असे सांगण्यात आले. त्यामुळे सुसाइड नोट आत्महत्या झाल्यानंतर न सापडता नंतर कशी काय सापडली अशी चर्चा अजूनही सुरू आहे. आत्महत्येच्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा सुसाइड नोट आहे अथवा नाही याची तपासणी केली जाते असे आरोपी मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनीही याला दुजोरा दिला आहे.
मराठीत सही कशी?
डॉक्टर नेहमी इंग्रजीमध्ये सही करायचे त्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख असायचा. परंतु सुसाइड नोटवरील स्वाक्षरी मराठी आहे. ती कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी निवासस्थानी बाथरूममध्ये स्वत:च्या कानशिलावर गोळ्या झाडून घेतल्या. येथून पोलिसांना जिवंत काडतूस, फायर झालेली पुंगळी, रक्ताचे डाग आदी दिसून आले. डॉक्टरांची पिस्तुल बाथरुममधून बेडरूममध्ये आले कसे हा प्रश्नही लोकांच्या मनात आहे.
दरम्यान, १७ एप्रिल २०२५ रोजी मनीषाने जो मेल डॉक्टरांना फॉरवर्ड केला त्यामध्ये घाणेरडे आरोप असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असा आरोप आहे. वास्तविक १७ एप्रिलच्या मेलनंतर डॉ. वळसंगकरांनी मनीषाला बोलावून तिची समजूत घातली होती. यावर तिने डॉक्टरांना माफीही मागितली होती. त्यामुळे त्या मेलमुळे डॉक्टर एवढ्या टोकाचा निर्णय घेतील असे वाटत नाही. सुसाइड नोटही घटनास्थळी सापडत नाही. ती नंतर सापडते ही बाब सामन्यांना संशयास्पद वाटते.