अहमदाबाद - मागील महिन्यात ९ फेब्रुवारीला नडियाद इथं झालेल्या ३ जणांच्या मृत्यूचं रहस्य अखेर उलगडलं आहे. या तिघांचा मृत्यू मादक पदार्थांच्या सेवनामुळे झाल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. सुरुवातीला हे प्रकरण विषारी दारूशी जोडले गेले. या प्रकरणात एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एका शिक्षकाने इन्शुरन्सची रक्कम आपल्या कुटुंबाला मिळावी यासाठी सुसाईडची आयडिया शोधली. इन्शुरन्स कंपनी अशा कुटुंबाला तेव्हाच मदत करते ज्यात पॉलिसीधारकाचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती झाला असेल. त्यामुळे स्वत:च्या नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचण्यासाठी शिक्षकाने सोडियम नायट्राइट विष ३ जणांवर प्रयोग करून पाहिले. त्या तिघांचा मृत्यू झाला. ३ आठवड्यानंतर जेव्हा पोलिसांना या विषाचा शोध घेत शिक्षकाला अटक केली तेव्हा हे सर्व षडयंत्र उघड झालं.
वडिलांच्या मृत्यूनंतर उचललं पाऊल
नडियाद येथील शिक्षक हरिकिशन मकवाना याने विम्याची २५ लाख रक्कम मिळवण्यासाठी ३ निर्दोष लोकांना विष पाजलं. हा शिक्षक वडिलांच्या मृत्यूनंतर आर्थिक संकटाचा सामना करत होता. जर आत्महत्या केली असती तर कुटुंबाला रक्कम मिळाली नसती. कायद्यातील समस्येमुळे वडिलांचा मृत्यू झाला असं शिक्षकाला वाटत होते. पत्नी आणि मुलाच्या भविष्याची चिंता करत स्वत:चा मृत्यू अपघात किंवा हत्या दाखवण्याची त्याने योजना बनवली. गुजरातच्या एका तांत्रिक कांडने त्याला आयडिया मिळाली, मकवानाने ऑनलाईन सोडियम नाइट्राइट मागवलं आणि स्वत: वर प्रयोग करण्याऐवजी त्याने आधी दुसऱ्यावर त्याचा वापर केला.
चाचणीसाठी मूकबधिरांना निवडलं
दरम्यान, सोडियम नाइट्राइट मागवून त्याने ते जीरा सोडामध्ये मिसळलं आणि दुसऱ्याला ते प्यायला दिले. शिक्षकाने प्लॅनिंगनुसार त्याचा वापर करण्यासाठी मूकबधिर लोकांना निवडलं जेणेकरून ते वाचले तरीही कुणाला काही बोलू शकणार नाहीत. शिक्षकाने दिलेला जीरा सोडा कनुभाईने त्याच्यासोबत आणखी २ लोकांना शेअर केला. जीरा सोड्यात सोडियम नाइट्रेड मिसळल्याने त्या तिघांचा मृत्यू झाला. विसरा रिपोर्टमध्ये त्या तिघांच्या मृतदेहात सोडियम नाइट्रेड आढळलं, त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता २८ दिवसांनी प्रकरणाचा उलगडा झाला.