नोएडा - ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात हुंड्याच्या मागणीवरून विवाहितेच्या हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. सासरच्या लोकांनी विवाहितेला बेदम मारहाण करून तिला आग लावली असा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत या महिलेला हॉस्पिटलला नेण्यात आले परंतु उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेची बहीण आणि तिच्या कुटुंबाने सासरच्यांविरोधात तक्रार दिली आहे.
पीडित कुटुंबाचे म्हणणं आहे की, मृत निक्कीचे डिसेंबर २०१६ साली सिरसा गावातील विपिनसोबत लग्न झाले होते. लग्नात स्कोर्पिओ कारसह भरपूर हुंडा दिला होता. त्यानंतरही पती विपिन, दीर रोहित, सासू दया, सासरे सतवीर यांनी आमच्याकडे अतिरिक्त ३५ लाखांच्या हुंड्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करू नसलो तरी आम्ही आणखी एक कार त्यांना दिली. परंतु निक्कीवर मारहाण आणि मानसिक छळ सुरूच होता असा आरोप त्यांनी केला.
या वादावर बऱ्याचदा पंचायतीसमोर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या सासरचे सुधारले नाहीत. निक्की आणि तिची बहीण कांचन जिचे लग्नही त्याच कुटुंबात झाले होते. दोघांवरही कायम अत्याचार केला जायचा. माझी बहीण निक्कीला माझ्यासमोर बेदम मारहाण करण्यात आली होती, तिच्या गळ्यावरही हल्ला झाला होता. जेव्हा ती बेशुद्ध पडली तेव्हा तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावण्यात आली असं कांचनने सांगितले. शेजाऱ्यांच्या मदतीने निक्कीला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले परंतु तिथून दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. मात्र वाटेतच तिचा जीव गेला.
दरम्यान, या घटनेबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला, जेव्हा मृत महिलेच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत मुलगा स्पष्टपणे पप्पाने आईला लाइटरने जाळून मारले असं म्हणतोय. या व्हिडिओनंतर निक्कीच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनला जात कारवाईची मागणी केली. या घटनेत पोलिसांनी निक्कीचा पती विपिनला अटक केली आहे तर इतर ३ आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.