मुंबई - हॅलो, हा माझा नवीन नंबर आहे. जुना क्रमांक डिलीट करून हा नंबर सेव्ह करा...अमेरिकेत राहणाऱ्या नणंदेच्या नावाने आलेल्या या संदेशाला बळी पडून ६० वर्षीय आजीने तीन लाख रुपये गमावले. पुढे आणखी पैशांची मागणी होताच प्रत्यक्ष नणंदेला कॉल करून चौकशी केली तेव्हा आपण नणंद समजून सायबर भामट्यालाच पैसे पाठवत असल्याचे आजीच्या लक्षात आले. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी सायबर भामट्याविरुद्ध मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.
चेंबूरच्या रहिवासी भावना (६०) यांची सायबर भामट्यांनी फसवणूक केली आहे. त्यांची राशी नावाची नणंद अमेरिकेत राहते. १० एप्रिल रोजी मुलीच्या मोबाइल क्रमांकावरून राशीने नवीन क्रमांक पाठवून सेव्ह करण्यास सांगितले म्हणून, जुना क्रमांक डिलीट करून नवीन क्रमांक सेव्ह केला. नंतर त्या क्रमांकावरून राशीने आपल्या मुलीकडे एक लाखाची मदत करण्याबाबतचा संदेश पाठवला. मुलीने भावना यांना मेसेज केला. कॉल केला; पण तो घेतला नाही. व्हॉट्सॲपवर राशी हिने एक लाख रुपये तत्काळ हवे असल्याचे सांगतच भावना यांनी ११ आणि १५ एप्रिलला पैसे पाठवले. पुढे आणखीन ५ लाखांची मागणी केली. मात्र, आधीच तीन लाख रुपये पाठवले असल्याचे सांगताच, आपल्याला एकूण दहा लाखांची आवश्यकता असल्याचे राशी यांनी सांगितले.
मी पैसे मागितलेलेच नाहीत...अखेर, भावना यांनी नणंदेला पैसे नेमके कशासाठी हवे आहेत, असे विचारले तेव्हा आपण पैसे मागितलेले नाहीत, असे सांगितले. आपला मोबाइल हॅक झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ १९३० वर कॉल करत घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. यापूर्वी बँकेच्या अकाउंटने अशाच प्रकारे कंपनीचा संचालक समजून सायबर भामट्याला ३० लाख रुपये पाठवले होते.