लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत महिलेच्या मालमत्तेवर कब्जा करणाऱ्या साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पाचपावली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.रविशंकर पुरुषोत्तम सहारे, वैशालीनगर असे तक्रारदाराचे नाव आहे. ते एमआयजी क्वॉर्टरमध्ये राहतात. त्यांनी येथील वसुधा वासुदेव रुपदे यांच्याकडून काही वर्षांपूर्वी त्यांची स्थावर मालमत्ता विकत घेतली होती. वसुधा रुपदे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तेचे बनावट कागदपत्र तयार करून आरोपींनी मृत वसुधा यांच्या बनावट सह्या कागदपत्रावर केल्या. त्या आधारे लाखोंच्या मालमत्तेवर कब्जा केला. सहारे यांनी आरोपींना याबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांना मारहाण करून धमकी दिली आणि हाकलून लावले. २९ नोव्हेंबर २०१९ ला हा प्रकार उघडकीस आला. सहारे यांनी पोलिसांकडे धाव घेतली मात्र आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हे प्रकरण दडपले. दरम्यान, साहिल सय्यद हा बनावट कागदपत्र तयार करून, स्टिंग करून फसवतो आणि लाखोंच्या मालमत्ता हडपतो, हे उघड झाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध कारवाईची तयारी चालवली आहे. ही माहिती कळल्यानंतर सहारे यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांची तक्रार घेऊन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात याप्रकरणी सोमवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सहारे यांच्या तक्रारीनुसार आरोपी साहिलसोबत नीलिमा जयस्वाल (तिवारी) आणि गिरीश पद्माकर गिरीधर हे देखील आरोपी आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस या सर्वांचा शोध घेत आहेत.
बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखोंच्या मालमत्तेवर कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 20:43 IST
बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत महिलेच्या मालमत्तेवर कब्जा करणाऱ्या साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पाचपावली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखोंच्या मालमत्तेवर कब्जा
ठळक मुद्देपाचपावलीत गुन्हा दाखल