मुंबई : दुकानदारांचे क्यूआर कोड बदलून स्वत:च्या बँक खात्यात वळवणाऱ्या सुरक्षारक्षकाला खार पोलिसांनी अटक केली. शिवओम दुबे (२२) असे आरोपीचे नाव असून, त्याने क्यूआर कोड प्रिंट केले होते. हे कोड दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील दुकानांसह अनेक स्टॉल्सच्या बाहेरील वैध क्यूआर कोडवर चिकटवले होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याची तीन बँक खाती गोठवून ४९ हजार रुपये हस्तगत केले आहेत.
दिनेश गुप्ता (५६) याची खार पश्चिमेतील पी.डी. हिंदुजा मार्गावर पानाची टपरी आहे. काही दिवसांपासून ग्राहकांनी दुकानातील क्यू आर कोडवर पाठवलेले पैसे त्याच्या बँक खात्यात जमा होत नव्हते. तांत्रिक समस्या असल्याचे समजून त्याने दुर्लक्ष केले होते.
आतापर्यंत अनेकांना गंडविले१२ जुलै रोजी ग्राहकाचे पैसे खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे त्याने स्टॉलबाहेरील क्यूआर कोड तपासला त्यावर भलताच क्यूआर कोड चिकटविल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तो कोड स्कॅन केला तेव्हा त्यावर शिवम दुबे हे नाव दिसले. गुप्ता याने शेजारील दुकानदार लक्ष्मी यादव हिला फसवणुकीबाबत सांगितले असता तिलाही ग्राहकांचे पैसे मिळत नसल्याचे समोर आले. तिनेही तिच्या दुकानाबाहेर कोड स्कॅन केला असता त्यावरही शिवम दुबे याचेच नाव असल्याचे स्पष्ट झाले.
यू ट्यूबवरून मिळाली आयडिया शिवकुमार दुबे हा १० वी पास असून, त्याने यू ट्यूबवरील व्हिडीओ पाहून फसवणुकीसाठी स्वत:च्या बँकेचे कोड छापले होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्याने विशेषतः रेल्वेजवळील दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांना लक्ष्य केले. त्याला न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे गंडविले याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.