ठाणे : वागळे इस्टेट भागातील एका विवाहितेला विषारी रसायन पाजण्याची धमकी देत तिच्यावर अन्य दाेन मित्रांसह बलात्कार करणाऱ्या अजबअली शेख (३४) या आराेपीला सात वर्षांनंतर प. बंगालमधून अटक करण्यात वागळे इस्टेट पाेलिसांना यश आले आहे. त्याच्या अन्य दाेन साथीदारांना यापूर्वीच अटक केली आहे.शेख हा यातील पीडितेच्या पतीकडे कामाला हाेता. ती घरी एकटी असताना सप्टेंबर २०१६ ते २१ जून २०१८ या दाेन वर्षांच्या कालावधीमध्ये शेख आपल्या मालकिणीच्या घरी येऊन तिला शरीरसंबंधांसाठी जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत हाेता. तिने प्रतिसाद न दिल्याने पोटॅश हे विषारी रसायन पाजण्याची तसेच तिची बदनामी करण्याची धमकी देत, तिला मारहाण करून तिच्यावर त्याने १५ सप्टेंबर २०१६ राेजी अत्याचार केले. त्यानंतर त्याचे अन्य दाेन साथीदार दिवाकर साठे याने दाेन वेळा तर संजीब मैती यानेही बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले.याप्रकरणी वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दिवाकर आणि संजीब या दाेघांना १६ नाेव्हेंबर २०१८ राेजी अटक झाली हाेती. परंतु यातील मुख्य सूत्रधार शेख हा तेव्हापासून पसार होता. आराेपीची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जे. ए. भाेसले यांच्या पथकाने त्याला प. बंगालमधून सात वर्षांनी अटक केली. शेख हा गुन्हा घडल्यापासून पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांत भूमिगत झाला हाेता.