फसवणुकीने केले लग्न; पत्नीसह सासरच्या मंडळींविरुद्ध पतीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 12:48 PM2019-08-01T12:48:48+5:302019-08-01T12:52:34+5:30

गर्भाशय नसल्याची माहिती लपविली; घटस्फोटासाठी मागितले दहा लाख

Fraudulent marriage; Husband complaint against wife with In law family | फसवणुकीने केले लग्न; पत्नीसह सासरच्या मंडळींविरुद्ध पतीची तक्रार

फसवणुकीने केले लग्न; पत्नीसह सासरच्या मंडळींविरुद्ध पतीची तक्रार

Next
ठळक मुद्देफसवणूक केल्याप्रकरणी एका पीडित पतीने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.सुरुवातीला कानांवर हात ठेवणाऱ्या पत्नीने आणि तिच्या माहेरच्या मंडळींनी नंतर हा प्रकार मान्यही केला. आपली ही बाब कधीही उघड होऊ शकते, म्हणून ती त्याला वेगवेगळ्या कारणांमुळे शरीरसंबंधासही नकार देत होती.

जितेंद्र कालेकर 

ठाणे - गर्भाशयच नसल्यामुळे अपत्यसुख देऊ शकणार नसल्याची बाब एका ३३ वर्षीय विवाहितेने अंधारात ठेवली. कहर म्हणजे पतीलाच मारहाण करण्याची तसेच खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन १० लाख रुपये दे, तरच तुला घटस्फोट देईन, अशी धमकी देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका पीडित पतीने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ठाण्याच्या शिवाजी पथ, नौपाडा भागात राहणारे अजमल शेख (३२, नावात बदल) यांचे ४ डिसेंबर २०१५ रोजी मुस्लिम रिवाजाप्रमाणे अंधेरी येथील शमीम शेख (३३, नावात बदल) हिच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीला या दोघांचाही चांगल्या प्रकारे संसार सुरू होता. परंतु, गेल्या चार वर्षांत त्यांना अपत्य नव्हते. मुळात तिच्या पोटात गर्भाशयच नव्हते. शिवाय, शारीरिक संबंधाच्या वेळी तिला त्रासही होत होता. याचसंदर्भात ७ आॅगस्ट २०१६ रोजी केलेल्या एका तपासणीमध्येही हे स्पष्ट झाले होते. तरीही, तिने आणि तिच्या माहेरच्या मंडळींनी ही बाब पतीपासून पडद्याआड ठेवली होती. आपली ही बाब कधीही उघड होऊ शकते, म्हणून ती त्याला वेगवेगळ्या कारणांमुळे शरीरसंबंधासही नकार देत होती.
पुढे तिने घरात जेवण बनवण्यासही नकार दिला. बाहेरून आणून खाण्याचाही तिने आग्रह धरला. किरकोळ भांडणांसह तिच्या विचित्र वर्तणुकीमध्येही वाढ झाली. यातूनच २० एप्रिल २०१९ रोजी त्यांच्यात असेच कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे त्याच्या भावाच्या सल्ल्याने ते ठाण्यातून भिवंडीत एकत्र कुटुंबातून वेगळे राहू लागले. भिवंडीत असतानाच काही वैद्यकीय रिपोर्ट या पतीच्या हाताला लागले. त्यामध्येच पत्नीला गर्भाशय नसून ती कधीच आई होऊ शकणार नाही, ही बाब त्याला समजली. हा प्रकार समजल्यानंतर त्याला धक्काच बसला.
सुरुवातीला कानांवर हात ठेवणाऱ्या पत्नीने आणि तिच्या माहेरच्या मंडळींनी नंतर हा प्रकार मान्यही केला. त्यानुसार पत्नी, सासू, सासरे आणि मेहुणा यांनी अजमल आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफीही मागितली. त्याचवेळी तिला लग्नात मिळालेले स्त्रीधनही पतीने तिला परत केले. ४ मे २०१९ रोजी मात्र अजमल यांच्या साडूने त्यांना सासूसासऱ्यांसोबत येऊन ‘माझ्या मेहुणीला तू तलाक दिलास आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे वागला नाहीस, तर तुला पोलीस ठाण्यातच उलटे करून मारू, खोट्या केसमध्ये अडकवू, पोलीस ठाण्यात आमची ओळख आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी १० लाख रुपये आम्हाला द्या, तरच तुला घटस्फोट देऊ’, अशी धमकीही दिली. त्यानंतर सासू, सासरे, मेहुणा आणि साडू यांनी त्यांना शिवीगाळ तसेच दमदाटी करून पत्नीला माहेरी घेऊन गेले.

सखोल चौकशीचे आदेश

मासिकपाळीची तसेच ती कधीही अपत्यसुख देऊ शकणार नसल्याची बाब लग्न करतेवेळीच जाणूनबुजून लपवून ठेवल्याने आपल्यासह संपूर्ण परिवाराची फसवणूक करून वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या पत्नी शमीम व तिच्या माहेरच्या मंडळींविरुद्ध अजमल यांनी ठाणे न्यायालयात दावा दाखल केला आहे.
च्याचप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने १५६ (३) नुसार नौपाडा पोलिसांना दिल्यानंतर याप्रकरणी पत्नीसह पाच जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Fraudulent marriage; Husband complaint against wife with In law family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.