कार लोन न भरलेल्या गाड्यांच्या लिलावाची फसवी जाहिरात, तोतयागिरीत डॉक्टरला लाखोंचा चुना

By गौरी टेंबकर | Published: November 25, 2023 04:00 PM2023-11-25T16:00:41+5:302023-11-25T16:01:34+5:30

बँक मॅनेजरच्या तोतयागिरीत डॉक्टरला लाखोंचा चुना, कांदिवली पोलिसात गुन्हा दाखल

Fraudulent advertisement of auction of car loan defaulters fraud with doctor for lakhs of rupees | कार लोन न भरलेल्या गाड्यांच्या लिलावाची फसवी जाहिरात, तोतयागिरीत डॉक्टरला लाखोंचा चुना

कार लोन न भरलेल्या गाड्यांच्या लिलावाची फसवी जाहिरात, तोतयागिरीत डॉक्टरला लाखोंचा चुना

मुंबई: कारचे लोन थकलेल्या गाड्यांचा लिलाव होत असल्याची फसवी जाहिरात फेसबुकवर देत भामट्याने स्वतःला बँक ऑफ बडोदाचा रिकव्हरी क्रेडिट मॅनेजर म्हणवत एका डॉक्टरला लाखो रुपयांचा चुना लावला. हा प्रकार कांदिवली परिसरात घडला असून या विरोधात स्वतःचे खाजगी क्लिनिक चालवणारे जनरल सर्जन डॉ प्रभात शहा (५२) यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

शहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ते घरी असताना फेसबुकवर त्यांना एस कुमार या फेसबुक आयडीवर अज्ञात व्यक्तीच्या अकाउंटवर मोटरवाहन विक्रीची जाहिरात दिसली. त्यामध्ये फॉर्च्युनर ही गाडी १९ लाखांमध्ये विक्री करण्यात येणार असल्याचे म्हणत त्यामध्ये एक व्हाट्सअप नंबर देण्यात आला होता. स्वस्तात कार मिळत असल्याच्या आमिषाला ते भुलले आणि ती त्यांनी गाडी खरेदी करण्याचे ठरवले. त्यांनी सदर व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर फोन उचलणाऱ्या व्यक्तीने तो बँक ऑफ बडोदा बँकेचा रीकव्हरी मॅनेजर असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना फॉर्च्युनर गाडी खरेदी करायची आहे असे त्यांनी त्या व्यक्तीला सांगितले. त्यावर बँक आता बंद झाली असून मला याबाबत बँक मॅनेजरशी चर्चा करावी लागेल. त्यामुळे तुम्ही मला २५ ऑक्टोबरला फोन करा असे त्यांना सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी फोन केल्यावर सदर व्यक्तीने आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन मोबाईल नंबर आणि मोटर वाहनाची जी किंमत आहे त्याच्या तीन टक्के रक्कम भरावी लागेल असे सांगत आयडीबीआय बँकेचा अकाउंट नंबर दिला. हे अकाउंट रामकुमार सिंग नामक व्यक्तीच्या नावावर होते त्यानुसार डॉक्टरांनी ५७ हजार रुपये पाठवले. इतकेच नव्हे तर लोन साठी लागणारे विजेचे बिल, दोन वर्षाचे बँक स्टेटमेंट आणि अन्य कागदपत्रे ही व्हाट्सअप केली. त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार रुपये मागण्यात आले. पैसे डॉक्टरांनी पाठवले आणि त्यांना भामट्याने सोलापूरला हनुमाननगर रेल्वे यार्डमध्ये जायला सांगितले.

मात्र डॉ. शहा हे सदर ठिकाणी गेल्यावर त्यांना कोणतीही गाडी सापडली नसल्याने ते मुंबईला परतले आणि त्यांनी त्या क्रमांकावर पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला जो होऊ शकला नाही. तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४१९,४२० तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६(सी), ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: Fraudulent advertisement of auction of car loan defaulters fraud with doctor for lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.