लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई/ठाणे : शेअर मार्केट गुंतवणुकीवर दरमहा ४ ते ५ टक्के हमखास परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा चुना लावून सागर कारीवडेकर हा ठग पसार झाला आहे. या भामट्याने गरिबांच्या पैशातून महागड्या गाड्या, बंगले बांधून मौज करत आहे. मुंबई, ठाणे पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचण्यास यश आलेले नाही.मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात गेल्यावर्षी सागरविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तसेच त्या आधी २६ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी येथे देखील गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून तो फरार आहे. त्यापाठोपाठ काही दिवसांपूर्वी ठाणे नगर पोलिस ठाण्यात सागर आणि सचिन राणेविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.
ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तक्रारदार साक्षी गावडे (४१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२०-२१ दरम्यान २ लाख ते २६ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर दरमहा ४ टक्के, तर २६ लाखांवरील रकमेवर ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. वार्षिक ४८ टक्के परतावा, जोखीम नाही, मूळ रक्कम सुरक्षित राहील, अशा आश्वासनांसह एमओयू करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारदारांनी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ दरम्यान २६ लाख टप्प्याटप्प्याने आरटीजीएसद्वारे जमा केले. त्यापैकी ११ लाख २४ हजार रुपये परत मिळाले असले तरी उर्वरित १४ लाख ७६ हजार रुपये थकीत असल्याचे सांगण्यात आले. जून २०२५ मध्ये देण्यात आलेला धनादेश बाउन्स झाला. याशिवाय इतर ११ गुंतवणूकदारांचीही फसवणूक झाली. एकूण रक्कम १ कोटी ७८ लाख ९९ हजार असल्याचा आरोप आहे.
हिप्नोटिस्ट म्हणतो आम्हीही जाळ्यात अडकलो...गुन्हा दाखल होण्याच्या काही दिवसांपूर्वी यात सहआरोपी करण्यात आलेले हिप्नोटिस्ट सचिन राणे यांनीही ठाणे नगर पोलिस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे जबाब नोंदवत आपलीही फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. राणे यांच्या म्हणण्यानुसार, सावंतवाडी येथील सागर कारीवडेकर व त्यांची पत्नी सलोनी कारीवडेकर यांनी शेअर मार्केट तज्ज्ञ म्हणून भासवत मोठ्या नफ्याचे आश्वासन दिले. त्यांनी मुद्रांकित कागदपत्रांवर दरमहा ४ ते ५ टक्के परतावा देण्याची लिखित हमी दिली होती. सुरुवातीला वेळेवर परतावा दिल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास बसला आणि गुंतवणुकीची रक्कम वाढत गेली.
अडीच कोटींची फसवणूक; ३५० धनादेश बाउन्सराणे दाम्पत्यानेही ऑक्टोबर २०२१ मध्ये एकूण २.५० कोटी रुपये संबंधितांच्या खात्यात जमा केल्याचा दावा केला आहे. एप्रिल २०२५ पर्यंत परतावा मिळत असताना मे २०२५ पासून अचानक पैसे देणे बंद करण्यात आले. सुमारे ३५० धनादेश वितरित करण्यात आले, मात्र ते सर्व बाऊन्स झाले. आरटीजीएसद्वारे पैसे जमा करण्याचे आश्वासनही त्यांच्याकडून पाळले गेले नाही. १४ ऑगस्ट २०२५ रोजी कारीवडेकर दाम्पत्य हे त्यांचे मोबाइल बंद करून फरार झाल्याचे राणे यांच्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच सागरने जवळपास १२०० हून अधिक लोकांची मोठी फसवणूक केल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आलेला आहे.
Web Summary : Sagar Karivadekar allegedly defrauded investors with false high-return promises. He built a lavish lifestyle from stolen funds. Police are investigating multiple complaints involving crores of rupees. Victims include numerous investors.
Web Summary : सागर करीवडेकर पर निवेशकों को झूठे उच्च रिटर्न का वादा करके धोखाधड़ी करने का आरोप है। उसने चोरी के धन से शानदार जीवन शैली बनाई। पुलिस करोड़ों रुपये से जुड़ी कई शिकायतों की जांच कर रही है। पीड़ितों में कई निवेशक शामिल हैं।