मुंबई : बारा वर्षीय मुलीला डोळा मारून तसेच तिला शंभर रुपयांची नोट दाखवून ‘माझ्यासोबत चल’ असे म्हणणे, हे सुद्धा एक प्रकारची लैंगिक छळवणूक आहे, असे निरीक्षण नोंदवत विशेष पॉक्सो न्यायालयाने २८ वर्षीय तरुणाला चार वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली.केवळ लैंगिक अत्याचारासाठीच आरोपीने हे कृत्य केले. यामागे अन्य कोणताही उद्देश नव्हता, असे म्हणत न्यायालयाने आरोपी मोहम्मद मन्सुरी याला दोषी ठरवत चार वर्षांची शिक्षा ठोठावली.मन्सुरीला मार्च २०१७ मध्ये अटक करण्यात आली. त्यांनतर जानेवारी २०१८ मध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यांनतर तो फरार झाला. पोलिसांनी त्याला मे २०१८ मध्ये पुन्हा अटक केली. तेव्हापासून तो कारागृहातच आहे.मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, मार्च २०१७ मध्ये आपली मुलगी रडत घरी आली आणि मन्सुरीने केलेल्या कृत्याची माहिती आपल्याला दिली.यापूर्वीही अनेकदा असेच अश्लील हावभाव मन्सुरीने मुलीला करून दाखविले होते. त्यासंबंधी मुलीच्या आईने मुलीच्या वडिलांना याबाबत माहिती दिली आणि ते तिघे मन्सुरीच्या शोधात निघाले. तिथेच जवळपास बाजारात मन्सुरी आइस्क्रीम खाताना त्यांना दिसला. मुलीचे वडील त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या कानशिलात लगावली आणि आजूबाजूच्या लोकांनीही त्याला मारहाण केली. तिथे पोलीस आले आणि त्यांनी त्याला अटक केली, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.सर्व साक्षी-पुराव्यांची पडताळणी करून न्यायालयाने म्हटले की, ६ मार्च २०१७ रोजी आरोपीने पीडितेवर पाळत ठेवली आणि त्यापूर्वीही त्याने असे कृत्य केले आहे. पीडिता आणि आरोपी यांच्यात यापूर्वी कोणतेही वैर असण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याला नाहक या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे, असे म्हणू शकत नाही.साक्षीवर शंका नाहीमुलीलाही कोणी पढवले आहे, असेही दिसत नाही. त्यामुळे तिच्या साक्षीवर शंका घेण्याचा प्रश्न नाही, असे म्हणत न्यायालयाने आरोपीला चार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
अल्पवयीन मुलीला ‘माझ्याबरोबर येते का?’ असे म्हणणाऱ्याला चार वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 07:55 IST