पिंपरी : पगाराचे दोन वर्षांपासूनचे पूर्ण पैसे दिले नाहीत. तसेच पावणेदोन लाखांची मागणी करून ते न दिल्यास घरातील साहित्य घेऊन जाण्याची धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कळसकर (रा. सुखसागर नगर, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रावसो विष्णू शितोळे (वय ४१, रा. सुखसागर नगर, डाकेचौक, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. तानाजी विष्णू शितोळे (वय ३९, रा. डाकेचौक, कात्रज) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. फिर्यादी रावसो शितोळे यांचा भाऊ तानाजी शितोळे याच्या पगाराचे दोन वर्षांपासूनचे पूर्ण पैसे न देता आरोपी प्रशांत कळसकर यांनी त्यांना त्रास दिला. तानाजी शितोळे यांच्याकडे १ लाख ७५ हजार रुपये येणे असून, ते दिले नाही तर तुज्या घरातील सर्वांना मारून घरातील सर्व साहित्य घेऊन जाईन व पोलिसांत तक्रार देईन अशी धमकीही आरोपी कळसकर याने तानाजी शितोळे यांना दिली. आरोपी कळसकर याने भिती घालून तानाजी शितोळे यांना मानसिक त्रास देऊन त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे तानाजी यांचे भाऊ रावसो शितोळे यांनी याप्रकरणी कळसकर यांच्या विरोधात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:52 IST