गुजरातमधील बनावट मेडिकल डिग्री देणाऱ्या गँगचा मास्टरमाईंड हा काँग्रेसचा माजी नेता असल्याचं समोर आलं आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. आरोपी बनावट डॉक्टर यापूर्वी सूरतमधील काँग्रेसच्या मेडिकल सेलचा प्रमुख होता. काँग्रेस प्रदेश युनिटचे प्रवक्ते मनीष दोशी यांनी सांगितलं की, गुरुवारी अटक करण्यात आलेला रसेश गुजराती याला २०२१ मध्ये पदावरून हटवण्यात आलं.
राज्य सरकारचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी शुक्रवारी सूरतमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं की, रसेश गुजराती बनावट डॉक्टरांना डिग्री सर्टिफिकेट देत असे. या व्यक्तीने पैसे घेऊन अनेकांना बनावट डॉक्टर बनण्यास मदत केली. पोलिसांनी गुरुवारी गुजराती, त्याचे सहकारी बीएम रावत आणि इतर दहा डॉक्टरांसह १३ जणांना अटक केली.
पोलिसांनी त्याच्याकडून बनावट बॅचलर ऑफ इलेक्ट्रो-होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी (BEMS) डिग्री काढून घेतली आहे. पोलिसांनी बनावट डॉक्टरांच्या दवाखान्यातून ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीची औषधं, इंजेक्शन्स, सिरपच्या बाटल्या आणि सर्टिफिकेट जप्त केली आहेत.
गुजरात पोलिसांनी सूरतमध्ये बनावट मेडिकल डिग्री देणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला आहे. ही गँग ३२ वर्षांपेक्षा कमी वय आणि कमी शिक्षण असलेल्या बेरोजगारांना ७० हजार रुपयांना बनावट डिग्री देत होती. याशिवाय रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी पाच हजार रुपये फी घ्यायची. त्यापैकी एक बनावट डॉक्टर शमीम अन्सारी आहे, ज्याच्या चुकीच्या उपचारामुळे एका मुलीचा मृत्यू झाला.
गँगमधील मुख्य आरोपी रसेश गुजराती आणि बीके रावत यांच्याकडे शेकडो अर्ज आणि सर्टिफिकेट्स पोलिसांना मिळाली आहेत. या गँगने आतापर्यंत १२०० जणांना बनावट मेडिकल डिग्री सर्टिफिकेट दिली आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणाचाअधिक तपास करत आहेत.