नवी दिल्ली - ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे ईडीने २ ठिकाणी छापेमारी केली. या धाडी शक्तिरंजन दास यांच्या घरी आणि त्यांच्या कंपन्या अनमोल माइन्स प्रायव्हेट लिमिटेड, अनमोल रिसोर्सेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयात टाकण्यात आल्या. ईडीकडून ही कारवाई देशातील बँक फ्रॉड प्रकरणातील एक इंडियन टेक्नोमॅक कंपनी लिमिटेडच्या निगडित करण्यात आली. ITCOL कंपनी आणि त्यांच्या संचालकांनी २००९ ते २०१३ या काळात बँकांकडून जवळपास १३९६ कोटी कर्ज बोगस कागदपत्राच्या आधारे घेतले. त्यानंतर ही रक्कम शेल कंपन्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आली.
या प्रकरणात ईडीने आधीच ३१० कोटींची संपत्ती जप्त केली आहे. त्यातील २८९ कोटी रूपये एप्रिल २०२५ मध्ये बँकांना परत करण्यात आले. या चौकशीत ITCOL ने शेल कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास ५९.८० कोटी रूपये ओडिशातील अनमोल माइन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ट्रान्सफर केल्याचं समोर आले. AMPL कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर शक्तिरंजन दास यांनी ITCOL चे प्रमोटर राकेश कुमार शर्मा यांच्या मदतीने बँक कर्जाची रक्कम माइनिंग बिझनेससाठी वापरली. काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला असा आरोप ईडीने केला आहे.
शनिवारी ईडीने या प्रकरणात धाड टाकली असता अनेक महागड्या कार, लग्झरी वस्तू सापडल्या. त्यात १० लग्झरी कार, ३ सुपरबाइक्स ज्यांची किंमत ७ कोटींहून अधिक आहे. पोर्श केयेन, मर्सिडिज बेंज जीएलसी, बीएमडब्ल्यू एक्स ७, ऑडी ए ३, होंडा गोल्ड विंग बाइकसह इतर गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय या धाडीत १.१२ कोटी किंमतीचे दागिने, १३ लाखांची रोकड, जमिनीचे कागदपक्षे, २ लॉकर हेदेखील जप्त केले आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून आणखी मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ही कारवाई करणे हा तपासाचा सुरुवातीचा टप्पा आहे. जप्त केलेल्या कागदपत्रे आणि डिजिटल डेटाची तपासणी केल्यानंतर येत्या काळात आणखी घबाड हाती लागू शकते. एजन्सी आता आयटकोल, एएमपीएल आणि त्यांच्याशी संबंधित इतर कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करत आहे असं ईडीने स्पष्ट केले आहे .