नवी दिल्ली - बॉलीवूड दिग्दर्शक, लेखक, अभिनेते आणि कॉमेडियन सतीश कौशिक यांचे ९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. ८ मार्च रोजी मध्यरात्री २.३० च्या सुमारास अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. होळी साजरी करण्यासाठी ते दिल्लीत आले होते आणि येथेच त्यांचे निधन झाले. सतीश कौशिक यांच्याबाबत प्राथमिक तपासात त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणे बाकी आहे.
दिल्लीतील दीनदयाल रुग्णालयात हे शवविच्छेदन झाले, ज्याच्या रिपोर्टची पोलीस वाट पाहत आहेत. मात्र आता या प्रकरणात नवे वळण आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सतीश कौशिक ज्या फार्महाऊसमध्ये राहत होते, तिथून पोलिसांना काही औषधे सापडली आहेत, ज्याची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे पथकाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील पुष्पांजली फार्महाऊसमधून काही औषधे मिळाली आहेत. सतीश कौशिक यांचा मृत्यू झाल्याच्या रात्री ते येथेच मुक्कामाला होते. कौशिक त्यांच्या मित्राच्या निमंत्रणावरून गुरुग्राममध्ये होळी साजरी करण्यासाठी आले होते. रात्री उशिरा सतीश कौशिक यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
सतीश कौशिक यांच्या खोलीतून कोणती औषधे सापडली?याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फार्महाऊसवर कोण होते याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. कौशिक यांना रुग्णालयात कधी नेण्यात आले? त्यांनी काय खाल्लं आणि काय प्यायलं तिथपासून त्यांच्या गेस्टच्या यादीपर्यंत सर्व अँगलने पोलीस तपास करत आहे. आता पोलिसांना सतीश कौशिकच्या खोलीतून काही औषधे सापडली असून त्यात सुगर ते गॅस सारख्या नियमित औषधांचा समावेश आहे. पण काही औषधे आहेत ज्यांची चौकशी केली जाईल.
पोस्टमोर्टमच्या सविस्तर अहवालाची प्रतिक्षाआतापर्यंत तपासात संशयास्पद काहीही आढळले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच अभिनेत्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा नव्हत्या. सद्यस्थितीत, पोलिस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रत्येक लहान घटनेचा बारकाईने पालन करत आहेत. तसंच डिटेल पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे.