लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोली पोलिसांच्या पथकावर वाहन चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दारू तस्करीतील टोळीचा आरोपी नीरज राघवानी यास गुन्हे शाखेने अटक केली आहे.झोन पाचच्या पथकाने शनिवारी दुपारी त्याला जरीपटकात साथीदाराच्या घरून अटक केली. नीरजला अटक झाल्यामुळे साडेतीन महिन्यानंतर गडचिरोली पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. नीरज येंगलखेडा, कुरखेडा येथील रहिवासी असून तो बऱ्याच दिवसांपासून दारूची तस्करी करतो. तो नागपुरातून दारू खरेदी करून गडचिरोलीत पुरवठा करतो. अनेक दिवसांपासून हे रॅकेट सुरू आहे. नीरज गडचिरोलीतील दारूचा तस्कर निर्मल धमगाये सोबत काम करतो. १५ऑक्टोबरला गडचिरोली पोलिसांना निर्मल धमगाये आणि त्याचा मुलगा तरुण धमगाये दारूची खेप घेऊन येत असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मार्गावर वाहनांची तपासणी सुरु केली. त्यांना निर्मल, तरुण, नीरज आणि त्यांचे साथीदार चारचाकी वाहनाने येताना दिसले. पोलिसांनी त्यांच्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला. नीरज वाहन चालवित होता. त्याला पोलीस दिसल्यावर त्याने वाहनाचा वेग वाढवून पोलिसांच्या अंगावर वाहन चालविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संभाव्य धोका ओळखून तेथून बाजूला जात आपला जीव वाचविला. या घटनेमुळे गडचिरोली पोलिसात खळबळ उडाली. यापूर्वी चंद्रपूरच्या निरीक्षकाचा चिरडून खून केल्यामुळे पोलिसांमध्ये धास्ती होती. त्यानंतर नीरज फरार होता. गुन्हेशाखेच्या झोन पाचच्या पथकाने जरीपटका येथील दयानंद पार्कजवळ राहणाºया मित्राच्या घरून नीरजला अटक केली. त्याला ताब्यात घेऊन गडचिरोली पोलिसांना सोपविले. ही कारवाई निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश खोब्रागडे, दिनेश चाफलेकर, उत्कर्ष राऊत यांनी केली.
दारू तस्करीच्या टोळीतील आरोपीस नागपुरात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 23:12 IST
गडचिरोली पोलिसांच्या पथकावर वाहन चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दारू तस्करीतील टोळीचा आरोपी नीरज राघवानी यास गुन्हे शाखेने अटक केली आहे.
दारू तस्करीच्या टोळीतील आरोपीस नागपुरात अटक
ठळक मुद्देगडचिरोली पोलिसांवर वाहन चालविण्याचा केला होता प्रयत्न