मनीषा म्हात्रेमुंबई : फसवणूक झाली, पैसे गोठवले, आरोपी पकडला, तरीही रक्कम खात्यात परत मिळविण्यासाठी सात ते आठ महिने होऊनही पोलिस ठाणे, कोर्ट बँकेच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ अंधेरीतील रिअल इस्टेट ब्रोकर यमन सुरेश चटवाल यांच्यावर आली. गमावलेल्या रकमेपेक्षा ती परत मिळविण्यासाठी त्यांचा दुप्पट खर्च झाल्याने न्याय नेमका कुणाकडे मागायचा? असा संतप्त सवाल ते उपस्थित करत आहे.
३० जानेवारी २०२५ रोजी यमन यांनी इन्स्टाग्रामवर पाहिलेल्या व्हिलाबाबत १८ जणांसाठी बुकिंग करण्यासाठी ४३,५०० रुपये ॲक्सिस बँक बँकेतील खात्यावर पाठविले. काही दिवसांनी शंका आल्यावर परतावा मागितला, पण गुन्हेगाराने संपर्क तोडला. तात्काळ १९३० हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. महिनाभराने गुन्हा नोंद झाला, पण वास्तविक संघर्ष नंतर सुरू झाला. त्याच दिवशी त्यांच्याप्रमाणे आणखीन एकाची फसवणूक झाली. ओशिवरा पोलिसांनी तांत्रिक तपास करून मार्चमध्ये आकाश जाधवानीला अटक केली. ४२,५०० रुपये गोठवले. गोठवलेल्या रक्कमेसाठी पोलिसांनी कोर्ट ऑर्डर आणण्यास सांगितले. तीन महिन्यांच्या चकरांनंतर ऑर्डर मिळाली, वकिलासाठी ३० हजार रुपये खर्च झाले. पण प्रवास, पोलिस ठाण्यात थांबणे, कोर्टात तासन्तास वेळ व मानसिक ताण हा स्वतंत्र होता.
पैसे सुरक्षित असल्याचा आनंद ठरला क्षणिकपोलिसांनी बँकेला कोर्ट ऑर्डर पाठवून पैसे खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र बँकेने या खात्यात अनेक तक्रारी आल्याचे कारण पुढे करत अंतर्गत चौकशीचा हवाला दिला. कोर्ट ऑर्डर नंतर सात ते आठ महिने उलटूनही रक्कम जमा झाली नाही. अशाप्रकारे अनेकांना या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने काहींनी आशा सोडल्या. तर अनेकजण आजही पैशांसाठी पाठपुरावा करत आहेत. पैसे परत मिळवण्यासाठी ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो त्याप्रमाणे गोठवलेले पैसेही खात्यात तात्काळ परत येण्यासाठीही नियम हवेत. नाहीतर हादेखील वेगळ्या पातळीवरचा एक स्कॅमच ठरेल, असे चटवाल यांनी सांगितले.
Web Summary : Andheri resident Yaman Chatwal, defrauded and funds frozen, faces endless bank and court visits. Recovery costs exceed the loss; justice delayed.
Web Summary : अंधेरी निवासी यमन चटवाल, धोखाधड़ी और धन फ्रीज होने के बाद, बैंक और कोर्ट के चक्कर काट रहे हैं। वसूली की लागत नुकसान से अधिक है; न्याय में देरी।