नवी दिल्ली - शास्त्री पार्क परिसरात सोमवारी सकाळी एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या २१ वर्षीय युवकाला आधी बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या हाताची नखे उखडली. त्याला काठी आणि बेल्टने मारलं. इतक्या गंभीररित्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपासाला सुरुवात केली आहे.
माहितीनुसार, मृत रितिक वर्मा नावाचा युवक आरोपीच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह सापडला. सोमवारी सकाळी ११ वाजता महिलेच्या पतीने त्याला घरात पकडले आणि बंधक बनवले. आरोपीच्या पत्नीचं आणि रितिकचं अफेअर सुरू होतं. जेव्हा पतीला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने दोघांना एकत्र पकडले. त्यानंतर पत्नी आणि रितिक दोघांनाही मारहाण केली. जवळपास १ तास युवकाला मारलं. त्याच्या बोटाची नखे उखडली. शरीराच्या प्रत्येक भागावर मारहाणीच्या खूणा आढळल्या आहेत असं मृत युवकाच्या काकाने सांगितले.
रितिक वर्मा त्याच्या कुटुंबासह शास्त्री पार्क येथे भाड्याने राहायचा. कुटुंबात वडील प्रमोद वर्मा, आई अनिता वर्मा आणि २ बहिणी आहेत. रितिक त्याच्या वडिलांसह ट्रक चालवायचा. रितिकची एक मैत्रिण शास्त्री पार्कमध्ये राहायची. रितिकला १ तास मारहाण झाली. सकाळी ९ वाजता रितिकला कुणाचा तरी फोन आला त्यानंतर तो घरातून थोड्याच वेळात येतो सांगून घरातून बाहेर पडला. ११ च्या सुमारास कुणीतरी रितिकच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलाला अजमत आणि त्याचे सहकारी घरात बंधक बनवून निर्दयी मारहाण करत आहेत असं सांगितल्याचं नातेवाईकांनी म्हटलं.
रितिकचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले तेव्हा तिथे घरचा दरवाजा आतून बंद होता. आतमधून मुलाच्या ओरडण्याचा आवाज येत होता. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु तो उघडला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत घरचा दरवाजा उघडला. आतमध्ये पोलीस आणि नातेवाईक गेले तेव्हा रितिक जमिनीवर पडला होता, त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. बोटातून रक्त वाहत होते. दोन्ही हाताची नखे उखडली होती. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. त्यासोबत महिला आणि रितिकला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे रात्री ९ वाजता रितिकचा मृत्यू झाला.