योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूरसारख्या शांतताप्रिय शहरात मागील आठवड्यात झालेल्या दंगली भडकविण्यात सोशल माध्यमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आल्याची बाब समोर आली होती. मात्र, केवळ नागपूरच नव्हे तर देशपातळीवर अशा घटना वाढत आहेत. सोशल मीडियातून चिथावणीखोर भाषणे देत सामाजिक वातावरण बिघडविण्याच्या गुन्ह्यांमध्ये वर्षभरात ४५ टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली आहे.
‘लोकमत’ला ‘एनसीआरपी’कडून (नॅशनल क्राइम रेकॉर्डिंग पोर्टल) प्राप्त झालेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रक्षोभक भाषणे सोशल माध्यमांतून शेअर करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. यामुळे देशातील विविध भागांत दंगली पेटल्या. चिथावणीखोर भाषणे देणाऱ्यांविरोधात २०२३ मध्ये ३ हजार ५९७ घटना उघडकीस आल्या. मात्र २०२४ मध्ये यात ४५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली व हा आकडा ५ हजार २५०वर पोहोचला. २०२१ सालापासून यात सातत्याने वाढ होत आहे.
हॅकिंगमध्ये वाढ
ऑनलाइनद्वारे नोकरीच्या नावाखाली फसवणूक करण्याचे फ्रॉड घटले आहेत; परंतु सोशल मीडिया प्रोफाइल्सच्या हॅकिंगमध्ये मात्र वाढ झाली. २०२३ मध्ये हॅकिंगच्या ३३ हजार ७२३ घटना समोर आल्या. २०२४ मध्ये एनसीआरपीकडे ३८ हजार २९५ प्रकरणांची नोंद झाली. जॉब फ्रॉडच्या घटनांमध्ये १३ ७६४ वरून १० हजार ४६१ वर घट झाली.
वर्षनिहाय विविध गुन्ह्यांची आकडेवारी प्रकार २०२२ २०२३ २०२४ चिथावणीखोर भाषणे ४,०९२ ३,५९७ ५,२५०प्रोफाइल हॅकिंग २६,२८८ ३३,७२४ ३८,२९५ फेक प्रोफाइल १,२३,६२६ ३०,२३४ ३९,८४६ जॉब फ्रॉड १०,२९२ १३,७६४ १०,४६१सायबर स्टॉकिंग ४४,२७० ३९,०८० ३९,०७७