आईसाठी आपलं बाळ हे या जगात सगळ्यात महत्त्वाचं असतं. मात्र, या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. कर्नाटकातील बिदर शहरात एका सावत्र आईने तिच्या ७ वर्षांच्या मुलीची हत्या केली. तिने निष्पाप मुलीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. सुरुवातीला महिलेने कुटुंबातील सदस्यांना सांगितले की, मुलगी चुकून पडली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. परंतु सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर महिलेचा गुन्हा उघडकीस आला. आता पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
बिदरच्या आदर्श कॉलनीत ही घटना घडली आहे. मृत मुलीचे नाव शानवी असून, ती अवघ्या ७ वर्षांची होती. तिची सावत्र आई राधाने २७ ऑगस्ट रोजी शानवीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. शानवीची आई ६ वर्षांपूर्वी आजारपणामुळे मरण पावली. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर शानवीचे वडील सिद्धांत यांनी २०२३ मध्ये राधाशी दुसरे लग्न केले, त्यानंतर दोघांनाही जुळी मुले झाली.
सिद्धांत आणि राधा यांना जुळी मुले झाल्यानंतर सिद्धांतची दुसरी पत्नी राधा सावत्र मुलगी शानवी हिचा दुस्वास करू लागली होती. ती शानवीचा तिरस्कार करत होती. रागातूनच तिने शानवीला ढकलून दिले. कुटुंबाला वाटले की त्यांची मुलगी खाली पडून मरण पावली. मात्र, शेजाऱ्याने सीसीटीव्ही फुटेज पाठवले, तेव्हा सावत्र आईचे क्रूर कृत्य उघडकीस आले. यावेळी राधा मुलीसह टेरेसवर फिरताना दिसली.
आरोपी राधाला अटकसीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, शेजाऱ्याने १२ सप्टेंबर रोजी मुलीचे वडील सिद्धांत यांना व्हॉट्सअॅपवर एक व्हिडीओ पाठवला, ज्यामध्ये शानवीला खुर्चीवर बसवण्यात येत असल्याचे आणि तिच्यावर उलटी टोपली ठेवल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, मृत मुलीच्या आजीने राधाविरुद्ध तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपी राधाला अटक केली आणि तिला तुरुंगात पाठवले.
१५ दिवसांनंतर गुन्हा उघड!२७ ऑगस्ट रोजी राधाने शानवीला ढकलले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर १५ दिवसांपर्यंत तिच्या कुटुंबाला वाटले की शानवी चुकून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज बाहेर आल्यानंतर सत्य काही वेगळेच होते हे समोर आले. सत्य बाहेर येताच मृत मुलीच्या आजीने गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी आरोपी सावत्र आईला अटक केली.