आग्रा - विशाखापट्टणम येथून गांजा घेऊन दिल्लीत जात असलेल्या माय-लेकींसह चार ड्रग्स कॅरियरना आग्रा कँट रेल्वे स्टेशनवर जीआरपीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत ही ४ लाख रुपये सांगण्यात येत आहे.
आग्रा/इटावाचे सीओ जीआरपी दरवेश कुमार यांनी सांगितले की, स्टेशनांजवळ दक्षिण भारतातून येणाऱ्या ट्रेनमध्ये गांजाची तस्करी थांबवण्यासाठी तपासणी केली जात आहे. याच अभियानांतर्गत शनिवारी सकाळी विशाखापट्टणम येथून येणाऱ्या ट्रेनमधून चार जण उतरले. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला होत्या. स्टेशनच्या मागच्या गेटवर तैनात जीआरपीच्य़ा कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर शंका आली. तेव्या त्यांनी त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली. तेव्हा चार बॅगमधून ४० किलो गांजा जप्त करण्यात आला.
पकडण्यात आलेल्या लोकांमध्ये बलविंदर सिंह, सोमरतन, रंजित कौर आणि तिची मुलगी संदीप कौर यांचा समावेश आहे. चौकशीमध्ये आरोपींनी सांगितले की, विशाखापट्टणमधून गांजा खरेदी करून दिल्लीला जात होते. दिल्लीमध्ये त्यांना हा गांजा एका व्यक्तीकडे द्यायचा होता. उधमसिंहनगर येथील एक व्यक्ती गांजा मागवायची. त्यांनी सांगितले की, एका वेळच्या पुरवठ्यासाठी एका व्यक्तीला पाच हजार रुपये दिले जातात. मात्र तो गांजा कुठे पुरवते हे आपल्याला माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.
सीओ जीआरपी दरवेश कुमार यांनी सांगितले की, चौकशीमध्ये उधम सिंहनगर येथील रंजितचं नाव समोर आलं होतं. त्याचा मोबाईल नंबरही सापडला आहे. आता पथकांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. पकडण्यात आलेले लोक हे कॅरियर आहेत. यामधील मायलेकी दर दिवशी १० हजार रुपये मिळतील या आमिषामुळे त्यांच्या परिचितांसोबत गेल्या होत्या. चारही आरोपी हे मुळचे बरेली येथील रहिवासी आहेत. मात्र ते सध्या उधमसिंहनगर येथे राहतात.