नवी दिल्ली - तामिळनाडूमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली असून सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून संतापलेल्या भावाने टोकाचं पाऊल उचललं. बहीण आणि तिच्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली. तिला माहेच्यांनी जेवायला बोलावलं असतानाच घराच्या उंबरठ्यावरच भावाने दोघांना संपवलं आहे. य़ा घटनेने एकच खळबळ उडाली. लग्नाला असलेल्या विरोधातून नवदाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये हा धक्कादायक प्रकार घ़डला आहे.
अवघ्या पाच दिवसांपूर्वीचं या दोघांचं लग्न झालं होतं. कुटुंबाच्या विरोधानंतर तरुणीने पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केलं होतं. त्यानंतर माहेरच्या मंडळींनी दोघांना घरी जेवायला बोलावलं आणि घराच्या उंबरठ्याबाहेरच त्यांची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन आणि सरण्या असं या मृत दाम्पत्याचं नाव आहे. सरण्याचा भाऊ शक्तीवेल आणि त्याचा मित्र रणजीत यांनी हत्या केली.
सरण्या नर्स म्हणून एका रुग्णालयात काम करत होती. त्या ठिकाणी मोहन देखील आपल्या एका नातेवाईकाला घेऊन आला होता. येथेच या दोघांची ओळख झाली. काही दिवसांनंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर हे प्रेमात झालं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. त्यांनी विरोध केल्यामुळे सरण्या आणि मोहनने पळून जाऊन लग्न केलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरण्याला माहेरी जेवायला बोलवण्यात आलं आणि त्याच वेळी तिची हत्या केली. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. शक्तीवेलने बहिणीला घरी जेवणासाठी येण्याचं आमंत्रण दिलं. भाऊ आणि कुटुंबीयांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला, असा समज करुन सरण्या पतीसह माहेरी जेवायला गेली. त्याचवेळी उंबरठ्याजवळच शक्तीवेल आणि रणजीतने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.