ठाणे : नौपाड्यातील लॅपटॉप चोरीप्रकरणी महाराष्ट्र क्रिकेट क्लब (एसीए) मधील देवसिंग सिंग (२७, रा. उत्तराखंड) या शेफला नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून चोरीतील लॅपटॉपही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.तीनहातनाका येथील ‘बॉम्बे बेक हाउस अॅण्ड किचन’ या कॉफी शॉपमध्ये देवसिंग हा पूर्वी नोकरीला होता. त्याने या दुकानातील महत्त्वाच्या नोंदी असलेला ५५ हजारांचा नामांकित कंपनीचा लॅपटॉप चोरून पलायन केल्याची घटना १० आॅक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी १७ आॅक्टोबर २०१९ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात ‘बॉम्बे बेक हाउस अॅण्ड किचन’ या कॉफी शॉपच्या मालक रंजना नंबियार (३१) यांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार सुनील अहिरे, सुनील राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सिंग याची माहिती काढली. तो बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘एमसीए’च्या कॅन्टीनमध्ये शेफचे काम करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला २४ नोव्हेंबर रोजी रात्री या पथकाने ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली आहे.
लॅपटॉप चोर निघाला एमसीएचा शेफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 01:50 IST