दामदुप्पटीच्या ‘साखळी’चा आवळतोय ‘फास’; जादा नफ्याचे आमिष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 07:36 AM2021-01-25T07:36:23+5:302021-01-25T07:36:35+5:30

फसव्या कंपन्यांकडून कोट्यवधींचा गंडा; दोन वर्षांत २० गुन्हे दाखल

The ‘chain’ of the double chain is wrapped around the ‘trap’; The lure of extra profits | दामदुप्पटीच्या ‘साखळी’चा आवळतोय ‘फास’; जादा नफ्याचे आमिष 

दामदुप्पटीच्या ‘साखळी’चा आवळतोय ‘फास’; जादा नफ्याचे आमिष 

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : झटपट श्रीमंतीच्या मोहात अनेकजण दामदुप्पट देणाऱ्या कंपन्यांच्या जाळ्यात फसत आहेत. अशा गुंतवणुकीतून फसवणूक झाल्याचे दोन वर्षांत २० गुन्हे दाखल झाले आहेत; तर फसवणूक होण्यापूर्वीच पोलिसांनी पाच कंपन्यांवर गुन्हे दाखल करून कोट्यवधींचा अपहार वेळीच टाळला आहे.

गुंतवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना जादा नफ्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या कंपन्यांचे जाळे देशभर वाढत आहे. अशाच काही कंपन्यांनी नवी मुंबईतदेखील आपले जाळे पसरविले आहे. यापूर्वी अशा कंपन्यांकडून झालेले कोट्यवधींचे अपहार राज्यभरात गाजलेले आहेत. त्यानंतरही नागरिकांना दामदुप्पट योजनेतून झटपट श्रीमंतीचे स्वप्न दाखवून गुंतवणूक करून घेणाऱ्या कंपन्या राज्यभरात जाळे पसरत आहेत. अशा कंपन्यांनी नवी मुंबईतून एक हजाराहून अधिक व्यक्तींना आपल्या जाळ्यात गुंतवले आहे. त्यांपैकी काही व्यक्ती एजंटाची भूमिका बजावत असतात. कोणतीही नवी कंपनी आल्यास सुरुवातीला छोटी गुंतवणूक करून इतर गुंतवणूकदारांची साखळी वाढवत जाण्याची त्याची भूमिका असते. यासाठी दिखाव्याकरिता गुंतवणूकदारांपुढे श्रीमंतीचा थाट मांडला जातो. मात्र सुरुवातीचे काही महिने नफा दिल्यानंतर गुंतवणूकदार वाढताच जमा झालेले कोट्यवधी रुपये लाटून कंपन्या पळ काढतात. अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दोन वर्षांत २० गुन्हे घडले आहेत. त्यात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असून, काही आरोपी अद्यापही पोलिसांना चकवा देत आहेत. परिणामी २०१९ पासून गुन्हे शाखा पोलिसांनी अशा कंपन्यांच्या सेमिनारवर पाळत घेऊन गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली.

जादा नफ्याचे आमिष दाखवून नियमबाह्य गुंतवणूक करून घेणाऱ्या कंपन्यांकडून अनेकांची फसवणूक होत आहे, अशी कंपनी बंद करून संबंधितांनी पळ काढल्यानंतर नागरिक पोलिसांकडे तक्रार करतात. यामुळे आरोपी हाती लागत नसल्याने फसवणूक होण्यापूर्वीच अशा कंपन्यांचा शोध घेऊन कारवाई केली जात आहे. नागरिकांनी अशा कंपन्यांच्या आमिषाला बळी पडू नये. - प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा 

Web Title: The ‘chain’ of the double chain is wrapped around the ‘trap’; The lure of extra profits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.