भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेल्या जैसलमेर जिल्ह्यात आज एक मोठी घटना घडली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमधून विजेचा प्रवाह पास झाला. यामध्ये ८ प्रवासी जखमी झाले. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य पाच जणांवर उपचार सुरु आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी गर्दी केली होती. हे प्रवासी संत सदारामच्या जत्रेमध्ये सहभागी होऊन घरी परतत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरपासून १५ किमी अंतरावर सकाळी १० वाजता पोलजी डेअरीजवळ हा अपघात झाला. परिसरातील खिनिया व खुईयाळा गावातील ग्रामस्थ भाड्याने खासगी बस घेऊन संत सदाराम यांच्या जत्रेला गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली.
पोळजी डेअरीजवळ रस्त्याची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. यामुळे वरून जाणाऱ्या विजेच्या तारांची उंची कमी झाली होती. बसच्या छतावरही भाविक बसले होते. ते प्रवासी विद्युत तारांच्या संपर्कात आले आणि ही घटना घडली. संपूर्ण बसमध्ये करंट पसरला. मात्र, चालकाने तातडीने बस पुढे नेली. तोवर आठ जण गंभीररित्या विद्युत तारांमुळे भाजले होते. सर्व मृत आणि जखमी मेघवाल समाजाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसमध्ये बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.