‘बुली बाई’चा पर्दाफाश; तरुणीसह तिघांना अटक; तिघे इंजिनीअरिंगचे विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:33 AM2022-01-06T08:33:33+5:302022-01-06T08:33:40+5:30

३१ डिसेंबरला आरोपींनी हे ॲप ‘गिट हब’वर अपलोड केले. याच दिवशी श्वेता सिंगने बुली बाई ॲपचे ट्विटर हॅण्डल बनविले. या ॲपवरून शीख आणि मुस्लीम समुदायाला एकाच वेळी टार्गेट करण्यात आल्याचे दिसून येते.

‘Bully Bai’ exposed; Three arrested, including a young woman; all are engineering students | ‘बुली बाई’चा पर्दाफाश; तरुणीसह तिघांना अटक; तिघे इंजिनीअरिंगचे विद्यार्थी

‘बुली बाई’चा पर्दाफाश; तरुणीसह तिघांना अटक; तिघे इंजिनीअरिंगचे विद्यार्थी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बुली बाई ॲप प्रकरणात उत्तराखंडमधून ताब्यात घेतलेल्या श्वेता अनंत सिंह (वय १८) या तरुणीसह बुधवारी मयंक प्रदीपसिंह रावत (२१) याला अटक करण्यात आली आहे. या दोघांसह यापूर्वी अटक केलेला विशाल कुमार झा हे तिघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. श्वेताने बुली बाई ॲपचे ट्विटर हॅण्डल तयार केले होते, तर ॲप बनविणाऱ्याचा शोध सुरू आहे. यामागचा उद्देश स्पष्ट झाला नसून, शिख धर्मीयांनी ॲप तयार केल्याचा बनाव निर्माण केल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येते, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

सहा महिन्यांपूर्वी ‘सुल्लीडील्स’ या ॲपद्वारे मुस्लीम महिलांचे फोटो प्रदर्शित करून आभासी लिलावाद्वारे विक्री करण्याकरता गिटहब या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला होता. तसेच बुली बाई ॲपचा वापर करून मुस्लीम महिलांची बदनामी करण्याच्या हेतूने मुस्लीम महिलांचे फोटो ट्विटरवर प्रदर्शित करण्यात आले. याप्रकरणी दोन जानेवारीला गुन्हा नोंदवत, सायबर पोलिसांनी बंगळुरूच्या विशाल कुमार झा (२२) या तरुणाला अटक केली. तो बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. विशालला तांत्रिक ज्ञान असून, त्याने ओळख लपवून यात ट्विट केले आहेत. तसेच त्याचे यूट्यूब चॅनेलदेखील आहे. तो @khalsasupermecist या ट्विटर हॅण्डलवर स्वतः कॅनडामध्ये असल्याचे भासवून अनेकदा ट्विट करत होता. त्याच्याकडून एक मोबाईल, लॅपटॉप, दोन सीमकार्ड हस्तगत करण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ उत्तराखंडमधून श्वेतासह मयांकला चौकशीअंती अटक करण्यात आली आहे. 

श्वेता इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. प्राथमिक तपासात श्वेताने सांगितले की, तिला नेपाळमधील व्यक्ती आदेश देत होता. तो तिचा सोशल मीडियावरील मित्र आहे. Jattkhalsa०७ या ट्विटर हॅण्डलचा वापर श्वेता करत होती. मात्र, नेपाळ कनेक्शनबाबत अद्याप मुंबई पोलिसांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. श्वेताला पाच दिवसांचे ट्रांझिट रिमांड मिळाले आहे.

३१ डिसेंबरला आरोपींनी हे ॲप ‘गिट हब’वर अपलोड केले. याच दिवशी श्वेता सिंगने बुली बाई ॲपचे ट्विटर हॅण्डल बनविले. या ॲपवरून शीख आणि मुस्लीम समुदायाला एकाच वेळी टार्गेट करण्यात आल्याचे दिसून येते. तसेच, बुली बाई ॲपला फॉलो करणाऱ्या ट्विटर हॅण्डलची नावे ही शीख समुदायाशी संबंधित ठेवण्यात आली आहेत.  तिने हे नेमके का आणि कुणाच्या सांगण्यावरून केले याबाबत सायबर पोलीस तपास करत आहेत.

शेकडो महिला टार्गेट
श्वेताने सिंगने ट्विटरवर समाजातील प्रतिष्ठित मुली आणि महिलांचे फोटो वापरून बुली बाई नावाचे ॲप्लिकेशन विकसित केले. या ॲपवर भेट देणाऱ्यांकडून त्या महिलांवर बोली लावली जात होती. या ॲपद्वारे १०० मुस्लीम महिलांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये अभिनेत्री आणि काही पत्रकारांचीही नावे आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ५ ट्विटर हॅण्डलचा शोध घेतला आहे.

मुस्लीम महिलांपाठोपाठ हिंदू महिलाही टार्गेट
बुली-बाई ॲप प्रकरणात मुस्लीम महिलांना टार्गेट केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, सोशल मीडियावर आता हिंदू समुदायातील महिलांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर असणारे ग्रुप टेलिग्रामवर बनवले जात असल्याचे समोर येत आहे. याची गंभीर दखल घेत, केंद्रीय मंत्रालयाने हे चॅनेल ब्लॉक करण्याची कारवाई केली आहे. दुसरीकडे असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिला आहे.

Web Title: ‘Bully Bai’ exposed; Three arrested, including a young woman; all are engineering students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.