मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. याठिकाणी लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच वधूने असं काही केलं की वरासह त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. रात्री वराला दुधात अमली पदार्थ मिसळून नव्या वधूने लाखो रुपयांचा माल लंपास केला. ही घटना १४ डिसेंबर रोजी रात्री नौगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुलवाडा गावात घडली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी वधूचा विवाह १३ डिसेंबरलाच झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलवारा गावातील रहिवासी असलेल्या राजदीपचा विवाह नैगुवां येथील रहिवासी सुकन पाठक याने उत्तर प्रदेशातील चरखारी येथील खुशी तिवारी हिच्यासोबत ठरवला होता. १३ डिसेंबरला कुलवाराच्या मंदिरात या दोघांचे लग्न झाले.
या लग्नानंतर राजदीप आपल्या वधूसोबत आनंदाने आपल्या घरी आला. संध्याकाळनंतर संपूर्ण कुटुंबाने जेवण केले. त्यानंतर हनीमून साजरा करण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. यावेळी नववधूने दुधात अमली पदार्थ मिसळून राजदीपला प्यायला दिले. काही वेळाने राजदीप बेशुद्ध झाला. यानंतर वधूने घरातून सुमारे १२ लाख किंमतीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आदी घेऊन पळ काढला.
राजदीपच्या म्हणण्यानुसार, त्याला सकाळी शुद्धीवर आल्यावरच या प्रकरणाची माहिती मिळाली. यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत राजदीपने सांगितले की, त्याचे लग्न सुकन पाठकने लावले होते. वधू कुटुंबासह चरखारी येथे भाड्याच्या घरात राहते, असे सांगण्यात आले. लग्नापूर्वी मुलगी पाहण्याचा विधीही चरखारीत झाल्याचे सांगितले. तेथे दोन्ही बाजूच्या लोकांनी बसून लग्नाबाबत चर्चा केली आणि तारीख निश्चित झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पाहता, लुटारू वधूची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेत मुलगी एकटी नसून तिच्यासोबत एक संपूर्ण टोळी असण्याची शक्यता आहे. सध्या पोलिस गुन्ह्याचा नमुना आणि पुराव्याच्या आधारे लुटारू वधू आणि तिच्या टोळीचा शोध घेत आहेत.