चेन्नईच्या अन्नानगर परिसरात आज सकाळी एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनं परिसरात खळबळ माजली आहे. मृतांमध्ये डॉक्टर, त्यांची पत्नी आणि २ मुलांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी हे सर्व मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवून तपासाला सुरूवात केली. डॉक्टर दाम्पत्य खूप आनंदी होते, ऐशो-आरामात जीवन जगत होते असं डॉक्टरच्या वाहन चालकाने सांगितले. प्राथमिक तपासात २ कारणामुळे आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलीस माहितीनुसार, घरातील चौघाच्या मृत्यूचं कारण कर्जाचा बोझा आणि मुलावर नीट परीक्षेचा दबाव हे असण्याची शक्यता आहे. डॉक्टर बालामुरुगन हे सोनोलॉजिस्ट होते. त्यांची पत्नी सुमथी वकील होती तर २ मुले जसवंत कुमार आणि लिंगेश कुमार यांचा मृतदेह दोन वेगवेगळ्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. जसवंत कुमार हा नीटची परीक्षा देत होता. डॉक्टर बालामुरुगन अनेक अल्ट्रासाऊंड सेंटर चालवायचे. आज सकाळी त्यांचा वाहन चालक घरी पोहचला त्याने दरवाजा ठोठावला परंतु काहीच उत्तर आले नाही. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. त्यांनी घरचा दरवाजा उघडताच या चौघांच्या मृत्यूचं समोर आले.
ही आत्महत्या असावी असं प्रथमदर्शनी वाटत आहे. परंतु अद्याप कुणीही तक्रार दाखल केली नाही. कुटुंबाने मृत्यूपूर्वी सुसाईड नोटही लिहिली नाही, कुटुंबावर कर्जाचा बोझा होता का हेदेखील स्पष्ट नाही. पोलीस सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहेत असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.