मध्य प्रदेशमधीलभाजपाच्या सरपंचाचा कारनामा समोर आला आहे. भाजपा महिला कार्यकत्याला लग्नाचे आमिष दाखवत काही वर्षे तो तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. यासाठी त्याने तिच्यासोबत करार केला होता. ही महिला गर्भवती होताच तिचा गर्भपात करत तिला तसेच सोडून निघून गेला. या पीडित महिलेने आता पोलिसांचा दरवाजा ठोठावला आहे.
सिमरोलचा सरपंच लेखराज डाबी याने हे कृत्य केले आहे. त्याने भाजपाचीच महिला कार्यकर्ता असलेल्या महिलेसोबत लिव्ह इनमध्ये संसार थाटला. गेली अडीज वर्षे तो तिचे लैंगिक शोषण करत होता. लिव्ह ईनमध्ये राहण्यासाठी त्याने तिच्याशी अॅग्रीमेंटही केले होते. या सरपंचाचे माजी मंत्री उषा ठाकूर यांच्यासोबत सत्काराचे फोटो आहेत. ते तिने पोलिसांना दाखविले आहेत. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे.
लेखराज हा ५१ वर्षांचा आहे. तर भाजपा नेत्री असलेली महिला ही ३८ वर्षीय आहे. तिने लेखराजवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या करारामध्ये दोघे पती-पत्नी म्हणून राहणार असल्याचा उल्लेख आहे. ही महिला एका आर्मी अधिकाऱ्याच्या घरी जेवण बनविण्याचे काम करत होती. तसेच पार्ट्यांमध्ये देखील ती जेवण बनवायची. एका पार्टीमध्ये लेखराजसोबत तिची ओळख झाली.
लेखराजने तिला तो ठाकूर परिवारातील असल्याचे सांगितले होते. आमच्यामध्ये दोन लग्न करणे सामान्य असल्याचे त्याने तिला सांगितले होते. यामुळे तो तिच्याशी दुसरे लग्न करणार आहे, असे त्याने सांगितले होते. यानंतर तिला भाजपची कार्यकर्ता बनविण्यात आले.
लिव्ह इनमध्ये राहत असताना ती गर्भवती राहिली, तेव्हा त्याने तिचा गर्भपात केला. आता तो तिला सोडून गेला असून तिच्याकडे दैनंदिन खर्चासाठी देखील पैसे नाहीत. लेखराजने केवळ दोन दिवसांचे रेशन घरात दिले आणि फरार झाला असा तिचा आरोप आहे. आता त्याचे कुटुंबीय तिला जिवे मारण्याची धमकी देत आहेत. पोलिस अधिकारी रुपेश द्विवेदी यांनी सांगितले की, महिलेत्या तक्रारीवरून एफआयआर नोंदविला असून चौकशी केली जात आहे.