Cyber Fraud: ऑनलाईन फसवणुकीच्य घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून राजकारण्यापर्यंत सर्वांनाच सायबर गुन्हेगार आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत. कर्नाटकातही माजी मंत्री आणि भाजपच्या खासदाराच्या पत्नीची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी खासदाराच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट करत तिच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली. मात्र नंतर हे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर ही रक्कम परत मिळवून दिली.
कर्नाटकातील चिक्काबल्लापूर येथे सायबर गुन्हेगारांनी खासदार के. सुधाकर यांच्या पत्नी प्रीती सुधाकर यांची १४ लाखांची फसवणूक केली. ही घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. प्रीती सुधाकर यांच्या पतीच्या बँक खात्याची चौकशी करण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्यांना अटक करण्याची आणि बेकायदेशीर व्यवहार उघड करण्याची धमकी व्हिडिओ कॉलवर दिली होती. फसवणूक झाल्यानंतर, आरोपीने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, पण ते मिळाल्यानंतर तो गायब झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षीय प्रीती यांना मुंबई सायबर क्राइम अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यांकडून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने तुमच्या पतीचे बँक खाते बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय व्यवहारांशी जोडलेले आहे आणि जर त्यांनी व्हेरिफिकेशन अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले नाहीत तर त्यांना अटक केली जाईल अशी धमकी दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार ४५ मिनिटांत पैसे परत केले जातील असे कॉल करणाऱ्याने त्यांना सांगितले होते. अटकेच्या भीतीने प्रीती यांनी त्याच्या एचडीएफसी बँक खात्यातून १४ लाख रुपये एका अज्ञात येस बँक खात्यात ट्रान्सफर केले. मात्र त्यानंतर त्या व्यक्तीशी संपर्क होऊ शकला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, प्रीती यांनी त्याच संध्याकाळी सायबर गुन्हे पोलीस स्थानकाशी संपर्क साधला. पोलिसांनी गोल्डन अवर्समध्ये कारवाई करून प्रीती यांना राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल हेल्पलाइन १९३० वर गुन्हा नोंदवण्यास मदत केली आणि पैसे जमा झालेले खाते ताबडतोब गोठवले.
दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी, ४७ व्या एसीजेएम न्यायालयाने येस बँकेला गोठवलेले पैसे परत करण्याचे निर्देश दिले. संपूर्ण रक्कम एका आठवड्यात त्यांच्या खात्यात परत जमा करण्यात आली. एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.