बांगलादेशातील ३० वर्षीय मॉडेल मेघना आलमवर गंभीर आरोप झाला आहे. मेघना आलमने तिच्या सौंदर्याची भुरळ घालून सौदी अरबच्या राजदूतालाच जाळ्यात अडकवत त्याला ब्लॅकमेल करत होती. सुरुवातीला कमी पैशांमुळे राजदूताने हा प्रकार समोर आणला नाही परंतु मेघनाच्या डिमांड सातत्याने वाढू लागल्या. जेव्हा मेघनानं ६० कोटी टका (४५ कोटी) ची मागणी केली तेव्हा सौदी अरबच्या राजदूताने याची तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी मेघनाला अटक करून ३० दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. मेघनावर हनीट्रॅपचा आरोप लावण्यात आला आहे.
राजदूताला कसं अडकवलं?
फेब्रुवारी २०२० मध्ये इस्सा बिन युसूफ अल दुहैलन यांना बांगलादेशाचं राजदूत बनवण्यात आले. रिपोर्टनुसार, एका जवळच्या मित्राच्या माध्यमातून इस्सा आणि मेघना यांच्यात ओळख झाली. त्यानंतर बोलणे सुरू होत हळूहळू दोघे प्रेमात पडले. या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंध बनल्याचा दावा मेघनानं केला आहे. २०२४ साली इस्सा यांची बांगलादेशातून बदली झाली तेव्हापासून मेघनानं त्यांना ब्लॅकमेल करणे सुरू केले. इस्सा यांनी सुरूवातीला काही पैसे दिले परंतु मेघनाची डिमांड वाढत गेली. तिने इस्सा यांच्याकडे ६० कोटी टका डिमांड केली.
हे प्रकरण पोलिसांकडे पोहचले तेव्हा तपासात मेघनाने इस्सासोबतचे काही वैयक्तिक क्षण कॅमेऱ्यात कैद केल्याचं पुढे आले. हेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिने इस्सा यांना ब्लॅकमेल केले. तपासात मेघनासोबत आणखी एक व्यक्ती यात असल्याचं पुढे आले जो सौदी अरबमध्ये बिझनेस करतो. हे प्रकरण पोलिसांनी हनीट्रॅप विभागाकडे सुपूर्द केले. आता बांगलादेश पोलीस मेघनानं याआधी अन्य कुठल्या राजदूताला फसवलंय का याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, बांगलादेशातील बडे अधिकारी एकीकडे सौदीसोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यातच या ब्लॅकमेल कांडमुळे सौदी कोणता मोठा निर्णय घेणार नाही ना याची भीती बांगलादेशला सतावत आहे. मेघना आलम ही बांगलादेशातील सर्वात सुंदर मॉडेलपैकी एक आहे. तिने मिस अर्थ नावाचा खिताबही जिंकला आहे.