संकेतस्थळांवर राज्यभरातून दिवसाला सरासरी दोन तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:40 AM2020-01-09T05:40:18+5:302020-01-09T05:40:28+5:30

सायबर गुन्ह्यांत वाढ होत असताना अनेक जण केवळ बदनामीच्या भीतीने तर, काही जण पोलीस ठाण्याच्या चकरा नको म्हणून तक्रारीसाठी पुढे येत नाहीत.

average, two complaints a day from websites across the state | संकेतस्थळांवर राज्यभरातून दिवसाला सरासरी दोन तक्रारी

संकेतस्थळांवर राज्यभरातून दिवसाला सरासरी दोन तक्रारी

Next

मनीषा म्हात्रे 

मुंबई : सायबर गुन्ह्यांत वाढ होत असताना अनेक जण केवळ बदनामीच्या भीतीने तर, काही जण पोलीस ठाण्याच्या चकरा नको म्हणून तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. मात्र, नागरिक अनभिज्ञ असल्याने राज्यभरातून दिवसाला २ किंवा ३ तक्रारी या संकेतस्थळावर येत आहेत.
नागरिकांना तक्रारी करणे सोयीस्कर व्हावे म्हणून शासनासह, सायबर पोलिसांकडून तीन संकेतस्थळांबरोबर हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून २०१७मध्ये सायबर गुन्हे नोंद करण्यासाठी https://cybercrime.gov.in हे संकेतस्थळ सुरू झाले. सुरुवातीला ते केवळ महिला आणि बालकांच्या तक्रारींसाठी होते. आॅगस्ट २०१९पासून ते सर्वांसाठी खुले झाले. यात, आतापर्यंत अडीच हजारांच्या आसपास तक्रारी आल्या आहेत.
जुलै २०१८ पासून www.reportphishing.in हे संकेतस्थळ महाराष्ट्र सायबर पोलिसांनीे सुरू केले. यात बँकिंग किंवा संवेदनशील वैयक्तिक माहिती विचारणारे कोणतेही फसवे संदेश, ईमेल, फोन कॉल्स प्राप्त झाल्यास तक्रार करता येईल. तसेच मोबाइल चोरी किंवा हरवल्यास मोबाइलचा आयएमईआय क्रमांक ब्लॉक करण्यासाठी  www.ceir.gov.in  या संकेतस्थळावर तक्रार करू शकतात. सायबर पोलीस फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करत आहेत. मात्र अजूनही नागरिक या संकेतस्थळापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे येत तक्रार करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
>घरबसल्या करू शकता तक्रार
अनेकदा बदनामी, सायबर साक्षरतेच्या अभावामुळे तक्रारदार पुढे येत नाही. त्यामुळे गुन्हेगारही मोकाट राहतो. अशा वेळी सर्वांनीच सायबर सुरक्षेबाबत काळजी घ्यावी. त्यात, फसव्या कॉलबाबत समजताच, अथवा यात अडकले असल्याने घरबसल्याही संकेस्थळाच्या माध्यमातून आपण तक्रार नोंदवू शकता.
- बलसिंग राजपूत, अधीक्षक, सायबर महाराष्ट्र
आपल्या मोबाइलचा १५ अंकी आयएमईआय क्रमांक *#06# डायल करून नोंद करून ठेवा. जेणेकरून भविष्यात मोबाइल हरवल्यास याद्वारे त्याचा शोध घेण्यास मदत ठरू शकते. महिला आणि बालकांसाठी सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींकरिता हेल्पलाइन क्रमांक - १५५२६० हा आहे.

Web Title: average, two complaints a day from websites across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.