लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: न्यू इंडिया को-ऑप. बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. राजीव रंजन पांडे (वय ४५) असे त्याचे नाव असून, तो मुलुख झारखंडचा रहिवासी आहे. तो पवन गुप्ता नावानेही ओळखला जातो. त्याला २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आलेल्या माहितीनुसार, आरोपी उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाईने बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताने दिलेल्या ४० कोटींपैकी पांडेला १५ कोटी रुपये दिले. पांडेने त्याला व्यवसायात पैसे गुंतवल्यास अधिकच्या नफ्याचे आमिष दाखवले होते. यापूर्वी भाजप नेते हैदर आझम यांचा भाऊ जावेद आझम यालाही १५ कोटी दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. याच पैशांतून त्याने ११ इलेक्ट्रॉनिक दुकाने उघडल्याचाही संशय आहे. दुसरीकडे मेहताची ब्रेन मॅपिंग टेस्ट २८ मार्च रोजी करण्यात येणार आहे.